Prashant Jagtap: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शरद पवार गट पूर्ण ताकदीने उतरणार असून, आमच्या वाट्याला येणाऱ्या सर्व जागा आम्ही ‘तुतारी’ या चिन्हावरच लढवू, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मांडली आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी पक्षाने जय्यत तयारी केली असून पुण्यात बदलाचे वारे वाहत असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवार गटासोबत युती होणार का?
पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर भाष्य करताना जगताप म्हणाले, ‘अजित पवार काय निर्णय घेतील हे मला माहीत नाही, पण आमचे अंतिम नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे आहेत. कोणासोबत युती करायची आणि कोणाला आघाडीत घ्यायचे, याचा सर्वस्वी निर्णय पवार साहेबच घेतील. त्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असेल.’
हेही वाचा – Ajit Pawar: मतदारराजाने जो विश्वास दाखवला, तो आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण – अजित पवार
महाविकास आघाडीचे जागावाटप आणि काँग्रेसची ताकद
प्रशांत जगताप यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या समन्वयावर भर दिला. पुणे मनपासाठी जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून, २५ डिसेंबरपर्यंत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसची ताकद दुर्लक्षित करता येणार नाही. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी अजित पवार गटापेक्षा जास्त जागा निवडून आणल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीने निवडणूक लढवू, असे जगताप यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा –सिंदखेडराजामध्ये इतिहास! शरद पवारांचा शिलेदार सौरभ तायडे ठरले महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगराध्यक्ष
विजयी उमेदवारांवर लक्ष
प्रशांत जगताप यांनी सांगितले की, पुण्यात आम्ही सध्याच्या व्यवस्थेला सक्षम पर्याय देण्यास तयार आहोत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र येताना, केवळ निवडणूक लढवणे नव्हे तर ‘लढून जिंकण्याची क्षमता’ असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यावर सध्या खलबते सुरू आहेत. काल रात्रीपर्यंत या संदर्भात आघाडीच्या नेत्यांच्या सकारात्मक बैठका पार पडल्या आहेत.


