Lionel Messi Mumbai Tour: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर आहे. शनिवारी कोलकाता आणि हैदराबाद या दोन्ही शहरांमध्ये भेट देण्यासाठी गेला होता. आज तो मुंबई दौऱ्यावर येणार आहे. मेस्सी संध्याकाळी ५.३५ पर्यंत मुंबईत येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. संपूर्ण जगात आपल्या कामगिरीचा डंका वाजवल्यानंतर मेस्सी २०११ नंतर दुसऱ्यांदाच भारत दौऱ्यावर येणार आहे. कोलकाता आणि हैदराबादमध्ये मेस्सीला भेटण्यासाठी हजारो चाहत्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान मुंबईतही हजारो चाहते, मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी हजेरी लावणार आहेत.
वानखेडे स्टेडियमवर आज इतिहास घडणार
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आज मेस्सी आणि सेलिब्रिटी यांच्यात फुटबॉल सामना खेळवला जाणार आहे. दुपारी १:१५ वाजता मैदानात जाण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी डीजे असणार आहे. मेस्सी संध्याकाळी मैदानात प्रवेश करेल. तोपर्यंत डीजे चेतासचा शो असणार आहे. संध्याकाळी ५:०१ ते ५:३४ दरम्यान दोन मैदानांवर ७ vs ७ सामना खेळवला जाणार आहे. हा सामना संपल्यानंतर मेस्सी मैदानात प्रवेश करेल.
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि मेस्सी एकाच मैदानावर
त्याचं आगमन झाल्यानंतर, हा सामना खेळणाऱ्या सेलिब्रिटींना मेस्सीसोबत फोटो काढण्याची संधी मिळणार आहे. यादरम्यान तो पेनल्टी किक देखील देणार आहे. त्यानंतर मेस्सी मैदानात फेरफटका मारेल. चाहत्यांना त्याला जवळून पाहण्याची संधी मिळेल. वानखेडे स्टेडियमवर आज इतिहास घडणार आहे. कारण क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर आणि फुटबॉलचा ऑल टाईम ग्रेट लिओनेल मेस्सी दोघेही एकाच मैदानावर खेळताना दिसून येणार आहे.
कलाकारांची उपस्थिती
दोघेही एकत्र फुटबॉल खेळतील. त्यानंतर लिओनेल मेस्सी क्रिकेट देखील खेळू शकतो. दरम्यान सचिन तेंडुलकरसह जॉन अब्राहम, करीना कपूर खान आणि जॅकी श्रॉफसारखे दिग्गज अभिनेते देखील उपस्थित राहू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


