क्रिकेटकारणात भारतावर कुरघोडी करण्याचा एकही प्रयत्न पाकिस्तान सोडत नाही. पण, प्रत्येक वेळेस त्यांना मैदानाबाहेर आणि मैदानावर तोंडावर आपटावे लागते. सध्या सुरु असलेली टी २० विश्वचषक स्पर्धाही याला अपवाद ठरली नाही. भारताविरुद्ध खेळायचेच नाही अशी आडमुठी भूमिका घेऊन पाकिस्तानने मैदानाबाहेर विश्वचषक स्पर्धा विस्कळीत करण्याचा आतोनात प्रयत्न केला. मात्र, काय झाले…त्यांना कोणीच साथ दिली नाही. ज्या बांगलादेशसाठी त्यांनी हा निर्णय घेतला त्यांनी देखिल पाकिस्तानला खेळण्यासाठी भाग पाडले. मग मैदानावर आमचे फिरकी गोलंदाज भारतावर वर्चस्व राखणार असे सांगून त्यांनी विजयाची स्वप्ने बघण्यास सुरवात केली. सामन्याचा दिवस आला आणि त्यांचे स्वप्न बघता बघता धुळीस मिळाले. त्यापेक्षा त्यांना विजयाचे स्वप्न पाहण्याची संधीच मिळाली नाही.
पहिल्या षटकांत जरुर त्यांनी अभिषेक शर्माची विकेट मिळविली. पण, नंतर ईशान किशनने पाकिस्तानी गोलंदाजांना त्यांची जागा दाखवून दिली. फटकेबाजी आणि डावाला वेग कसा द्यायचा हे ईशानने दाखवून दिले. त्याला कर्णधार सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शिवम दुबे यांची पूरक साथ मिळाली. आमची फिरकी अशी…आमची फिरकी तशी…उस्मान तारिक आमचे प्रमुख अस्त्र..वगैरे वगैरे बोलता येईल ते पाकिस्तानी कर्णधाराने बोलून घेतले. भारताला रोखण्यासाठी त्यांनी सात फिरकी गोलंदाज वापरले. झाले काय..भारताने थेंबे थेंबे तळे साचे अशा संथ गतीने धावा करत पावणे दोनशेचे आव्हान उभे केले. या आव्हानासमोर मग ते इतके दबले गेले की विजयाचे स्वप्न बघण्यासाठी त्यांना संधीच मिळाली नाही. टी २० क्रिकेटमध्ये षटक नाही, तर प्रत्येक चेंडूला महत्व असते. हे त्यांच्या पचनीच नसावे. कारण, अशा वेगवान क्रिकेटमध्ये त्यांनी पहिले षटक निर्धाव खेळून काढले. त्यानंतर जसप्रित बुमराने त्यांना आपल्या गोलंदाजीचा दर्जा दाखवून दिला. बुमरा आणि पांड्याने आपले काम केल्यावर पाकिस्तानच्या नाड्या आवळायला भारताचे तीन फिरकी गोलंदाजही पुरे पडले. पाचवा गोलंदाज म्हणून तिलक वर्माचा उपयोग करुन घेतला, तर तो देखिल पाकिस्तानची विकेट मिळवून गेला. पाकिस्तानचे फलंदाज पूर्ण वीस षटकेही खेळू शकले नाहीत.
एक काळ होता इम्रान, वासिम अक्रम, जावेद मियॉंदाद, वकार युनुस, मुदस्सर नझर, रमीझ राजा, अकिब जावेद यांच्यासमोर भारतीय संघ ढेपाळत होता. पण, ते गेले आणि पाकिस्तानच्या क्रिकेटमधील रयाच निघून गेली. त्यानंतर आजपर्यंत एकदाही पाकिस्तान संघ भारतासमोर टिकू शकलेला नाही. मैदानात जमत नाही म्हटल्यावर पाकिस्तान मंडळाने मैदानाबाहेर भारतीय क्रिकेटला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना तेथेही जमले नाही. या दोन संघांत हस्तांदोलन हा नवा कुरापतीचा मुद्दा ठरतोय. क्रिकेट क्रिकेटसारखे खेळले जावे, त्यात प्रामाणिकपणा असावा असे वक्तव्य पाकिस्तान कर्णधार सलमान आघाने केले होते. भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलनास नकार दिला म्हणून क्रिकेट खेळायला ते विसरले नाहीत. पाकिस्तानने ते खेळून दाखवावे. भारताने आज परिपूर्ण क्रिकेट कसे खेळायचे हे दाखवून दिले. पाकिस्तानला आज धावांचे शतक गाठणेही मुश्किल झाले होते. भारताने आता बाद फेरी गाठली आहे. पाकिस्तानही बाद फेरी गाठणार आहे. कारण त्यांचा अखेरचा सामना दुबळ्या नामिबिया संघाशी आहे.
असो, भारतीय फलंदाजांच्या अपयशावर या स्पर्धेत पुन्हा एकदा गोलंदाजांनी पांघरुण घातले आहे हे विसरता येणार नाही. भारतीय फलंदाजांनी बाद फेरीत खेळताना या आघाडीवर सुधारणा करण्याची गरज आहे. एकटा ईशान किशन खेळतोयं. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन असे फलंदाज असूनही त्यांना अजून म्हणावी तशी वेगवान सुरुवात मिळालेली नाही. त्यामुळे मधल्या फळीवर आणि मधल्या षटकांत खेळण्याचे दडपण येत आहे. टी २० क्रिकेट हे असे आहे की एकदा का चांगली सुरुवात मिळाली की ती लय मधल्या षटकांत राखून नंतर पुन्हा अखेरच्या षटकांत निर्णायक घाव घालता येतो. भारताला यात सुधारणा दाखवावी लागेल. यापूर्वी सांगितले आहे आणि आता परत सांगतो कसोटी, एकदिवसीय क्रिकेटपेक्षा भारताचा टी २० संघ सर्वात भक्कम आहे. त्यांना सध्या तरी हरवणे खूप कठिण आहे. संघातील प्रत्येक खेळाडू इतका या लघुत्तम वेगवान क्रिकेटशी जोडला गेला आहे.
भारताचा विचार करताना आता अन्य संघाची कामगिरी बघूयांत. दक्षिण आफ्रिका बाद फेरीत पोहचले आहेत. आज भारत आणि त्यापूर्वी वेस्ट इंडिज संघ देखिल बाद फेरीत दाखल झाला आहे. वेस्ट इंडिज संघाची कामगिरी या स्पर्धेत नक्कीच लक्षवेधक ठरत आहे. बाद फेरीत आता वेस्ट इंडिज संघ कसा टिकून राहतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. ते आपण बघूच यांत..सध्या तरी भारताच्या विजयाचा आनंद घेऊ…कारण पाकिस्तान संघावरील विजय ही तमाम भारतीयांसाठी वेगळी मेजवानी असते. या विजयाशी देशातील लहानापासून अबाल वृद्धांपर्यंत प्रत्येक नागरिक जोडला गेलेला असतो.


