मुंबई: आयपीएल २०२५ च्या आधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मोठा धमाका करून चाहत्यांना जबरदस्त धक्का दिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने धडाकेबाज फलंदाज रजत पाटीदारला त्यांचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. ३१ वर्षीय रजत पाटीदार २०२१ पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी, रजत पाटीदारला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल ११ कोटी मोजत कायम ठेवले.
रजत पाटीदार स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे नेतृत्व करतो. रजत पाटीदार याला कर्णधारपदाचा खूप अनुभव आहे. अलिकडेच, त्यांच्या नेतृत्वाखाली, मध्य प्रदेशला सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीच्या अंतिम फेरीत नेले. डिसेंबर २०२४ मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान रजत पाटीदार याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद भूषवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
रजत पाटीदारने २०२४ च्या सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेतील १० सामन्यांमध्ये ६१.१४ च्या सरासरीने ४२८ धावा केल्या. या काळात रजत पाटीदारने ५ अर्धशतके झळकावली. रजत पाटीदारने या स्पर्धेत १८६.०९ च्या स्ट्राईक रेटने ३१ षटकार आणि ३२ चौकार मारले. त्याच्या आक्रमक फलंदाजी आणि शांत कर्णधारपदामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएल २०२५ मध्ये प्रचंड फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान रजत पाटीदारने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत २७ सामने खेळले आहेत. रजत पाटीदारने २७ आयपीएल सामन्यांमध्ये ३४.७४ च्या सरासरीने ७९९ धावा केल्या आहेत. रजत पाटीदारने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एक शतक आणि ७ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने ६८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४७३८ धावा केल्या आहेत, ज्यात १३ शतके आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, ६४ लिस्ट-ए सामन्यांमध्ये २२११ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ४ शतके आणि १३ अर्धशतके झळकावली आहेत. रजत पाटीदारने एकूण ७५ टी-२० सामन्यांमध्ये २४६३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १ शतक आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ
रजत पाटीदार (कप्तान), विराट कोहली, फिल साल्ट, जितेश शर्मा, देवदत्त पडिक्कल, स्वास्तिक चिकारा, लियाम लिविंगस्टोन, क्रुणाल पंड्या, टिम डेविड, जेकब बेथेल, रोमारियो शेफर्ड, स्वप्निल सिंह, मनोज भंडागे, जोश हेजलवुड, भुवनेश्वर कुमार, रसिक सलाम, यश दयाल, सुयश शर्मा, नुवान तुषारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंह, मोहित राठी.


