रबात (मोरोक्का) – क्रीडा विश्वात ब्युटिफुल गेम म्हणून ओळख असलेल्या फुटबॉलच्या दक्षिण आफ्रिका चषक स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या निकालाने गालबोट लागले आहे. सेनेगल विरुद्ध मोरोक्को संघांदरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात सेनेगलने १-० असा विजय मिळविल्यानंतर सामन्यात घडलेल्या माघार नाट्याचा हवाला देत आफ्रिकन फुटबॉल नियामक मंडळाने दोन महिन्यांनी अंतिम सामन्याचा निकाल रद्दबातल ठरवून मोरोक्कोला विजयी घोषित केले.
रबात येथील प्रिन्स मौले अब्देल लाह मैदानावर हा सामना १८ जानेवारी रोजी झाला होता. कमालीच्या संघर्षपूर्ण लढतीत सामन्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत गोलशून्य बरोबरीत होता. सामना संपण्यास काही क्षण असताना मोरोक्कोला मिळालेली पेनल्टी ही या सगळ्याचा वादाचे कारण ठरली. सेनेगलच्या संघाने या निर्णयाला विरोध करत खेळण्यास नकार दिला होता. सेनेगलच्या खेळाडूंनी माघार घेतली असेच सांगण्यात येत होते. मात्रक्ष, १८ मिनिटांच्या विलंबानंतर सेनेगल संघ मैदानात परतला. विशेष म्हणजे त्यानंतर त्यांनी मोरोक्कोच्या इब्राहिम डायझची पेनल्टी देखिल अडवली आणि अतिरिक्त वेळेत अखेरच्या क्षणी पापे गेये याने गोल करुन सेनेगलला १-० असा विजय मिळवून दिला.
मात्र, मोरोक्कोच्या तक्रारीनंतर आफ्रिकन फुटबॉलच्या नियामक मंडळाच्या (CAF) तक्रार निवारण समितीने आता तो निकाल रद्द केल्याचे जाहीर करत मोरोक्कोला विजेता घोषित केले आहे.सेनेगालने “अंतिम सामना सोडून दिल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे हा निर्णय बदलण्यात आला असून मोरोक्को संघाला विजेता घोषित करत आहोत, असे आफ्रिकन फुटबॉल नियामक मंडळाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मोरोक्कोच्या नावावर ३-० अशा विजयाची नोंद देखिल कऱण्यात आली आहे.
सेनेगाल फुटबॉल महासंघाने या निर्णयाला ‘अन्यायकारक, अभूतपूर्व आणि अस्वीकारर्ह’ असे म्हटले आहे. या निर्णयामुळे आफ्रिकन फुटबॉलची बदनामी झाली असल्याचे सांगत त्यांनी या निर्णयाविरोधात ‘कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट’ (CAS) कडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
सेनेगालच्या संघाने त्यांच्या वर्तनाद्वारे आफ्रिका कप ऑफ नेशन्स स्पर्धेच्या नियमावलीतील कलम ८२ चे उल्लंघन केले आणि परिणामी कलम ८४ लागू करण्यात आले, आफ्रिकन फुटबॉल नियामक मंडळाने म्हटले आहे.
कलम ८२, ८४ काय आहे?
कलम ८२ नुसार, जर एखाद्या संघाने खेळण्यास नकार दिला किंवा पंचांच्या परवानगीशिवाय निर्धारित वेळ संपण्यापूर्वी मैदान सोडले, तर तो संघ पराभूत मानला जाईल आणि स्पर्धेतून बाद होतो. कलम ८४ हे या तरतुदीला पूरक आहे. त्यानुसार, कलम ८२ चे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही संघाला कायमचे बाद केले जाईल आणि तो सामना ३-० अशा फरकाने हरला असल्याचे घोषित केले जाते.
अंतिम निकालाच्या विरोधात अपील करताना संघांच्या खेळाच्या कामगिरीला आव्हान देणे हा उद्देश नव्हता, तर “स्पर्धेच्या नियमांची अंमलबजावणी” करण्याची ती एक विनंती होती, असे मोरोक्कन फुटबॉल महासंघाने म्हटले आहे.
ते क्षण कसे विसरले जातील
उत्तर आफ्रिकन फुटबॉल पत्रकार माहेर मेझाही यांनी बीबीसी रेडिओ ५ लाईव्हला सांगितले की, निकाल बदलण्याच्या निर्णयामुळे मैदानावर घडलेल्या गोष्टींचा भावनिक प्रभाव बदलणार नाही.
ते म्हणाले, “सामन्याची ती शेवटची १६ मिनिटे आणि आम्ही जे पाहिले ते आम्ही पुसू शकत नाही. सेनेगालला ट्रॉफी उचलताना पाहणे, खेळाडूंचे पदकांसह घरी जाणे आणि त्यांची परेड पाहणे, या भावना आपण पुसून टाकू शकत नाही.”
युक्तीवाद कसा असेल
आता सेनेगाल हे प्रकरण स्वित्झर्लंडमधील क्रीडा लवादाकडे घेऊन जाणार आहे. तेथे युक्तीवाद करताना सेनेगल खेळ पुन्हा सुरु झाला, तेव्हा खेळ सुरु करण्यास कशी परवानगी मिळाली अशी भूमिका घेऊ शकते. आम्ही त्यांची पेनल्टी अडवली आणि त्यानंतर आम्ही गोल केला. सामना पूर्ण झाला. पारितोषिक वितरण देखिल झाले. मग, आता निर्णय कसा बदलला जाऊ शकतो अशी विचारणा सेनेगलकडून करण्यात येईल. क्रीडा लवादासमोर अशी प्रकरणे येतात तेव्हा मैदानावरील निकालाला महत्व देण्यात येते. त्यामुळे हा तांत्रिक निर्णय रद्द होऊन सेनेगलचा विजय कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.


