मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंनी आता त्यांचा मोर्चा इंडियन प्रीमिअर लीग-२०२५कडे वळविला आहे. सर्व खेळाडू आपापल्या फ्रँचायझीच्या सराव शिबिरात दाखल झाले आहेत. आयपीएलचे सर्वाधिक जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात कर्णधार हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा आदी खेळाडू दाखल झाले आहेत. अशात चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर रोहितकडे पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व जाण्याची चर्चा रंगली आहे. त्याला कारणही तसेच आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सलामी लढतीत रोहित शर्मा नेतृत्व करताना दिसण्याची शक्यता आहे.
मुंबई इंडियन्सची आयपीएल-२०२५मध्ये पहिली झुंज कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे. आयपीएलच्या मागील पर्वात हार्दिकवर वेळेत षटके पूर्ण न केल्याची चूक दोन वेळा केल्यामुळे कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार त्याच्यावर एका सामन्याची बंदी आहे. त्यामुळे सलामी लढतीला हार्दिक मुकणार आहे. त्यात मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हाही दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्याला मुकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत चेन्नईविरुद्धच्या लढतीत अनुभवी खेळाडू म्हणून रोहित नेतृत्व करताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. सूर्यकुमार यादव हा भारताचा टी-२० संघाचा कर्णधार आहे आणि तोही हार्दिकच्या अनुपस्थितीत कर्णधाराच्या शर्यतीत आहे.
रोहित शर्मासोबत सलामीला इंग्लंडचा अष्टपैलू विल जक्स खेळताना दिसेल. युवा फलंदाज नमन धीर याला तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाईल. त्याच्या सोबतीला चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा आहे. झारखंडचा युवा यष्टिरक्षक रॉबिन मिंझ याला पदार्पणाची संधी मिळू शकते. राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहर यंदा मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. जसप्रीतच्या अनुपस्थितीत मुंबईच्या गोलंदाजीची जबाबदारी दीपकवर असणार आहे. त्याच्या सोबतीला न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सेंटनर, मुजीब उर रहमान आणि ट्रेंट बोल्ट आहेत. कर्ण शर्मा हा आणखी एक फिरकी पर्याय मुंबईकडे आहे. चेन्नईच्या खेळपट्टीवर तो उपयुक्त ठरू शकतो. अर्जुन तेंडुलकरला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरविले जाण्याची शक्यता आहे.


