इस्लमाबाद: आशिया कप २०२५ च्या गट फेरीत भारताकडून सात विकेट्सनी झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (पीसीबी) गोंधळ उडाला आहे. पराभवासोबतच पाकिस्तानी खेळाडूंना मैदानाच्या मध्यभागी अपमानाचा सामना करावा लागला. खरं तर, या सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूशी हस्तांदोलन केले नाही. या घटनेनंतर पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी मोठा निर्णय घेत स्वतःच्या संचालकांना निलंबित केले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट संचालक उस्मान वहाला यांना तात्काळ निलंबित केले आहे. सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्याच्या वादग्रस्त घटनेला हाताळण्यात कथित त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे पाकिस्तानी संघ क्रीडा वृत्तीच्या बाबतीत कमकुवत स्थितीत आला होता. उस्मान वहाला गेल्या दोन वर्षांपासून या महत्त्वाच्या पदावर आहेत आणि ते पाकिस्तान सुपर लीगचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्यावर या संवेदनशील समस्येचे वेळेवर निराकरण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप आहे.
पीसीबीच्या अंतर्गत चौकशीमध्ये असे आढळून आले की, वहाला यांनी सामन्यापूर्वीच्या तयारीत पाकिस्तानच्या हितांचे रक्षण करण्यात निष्काळजीपणा दाखवला. सामना सुरू होण्यापूर्वीच त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून त्याचे निराकरण करायला हवे होते. सामना संपल्यानंतर दोन्ही संघानी औपचारिक समारोप न करता मैदान सोडले. या घटनेच्या निषेधार्थ पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा याने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत भाग घेतला नाही, तर मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी भारतीय संघाच्या वृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
मॅच रेफ्रींवरही कारवाईची मागणी
पाकिस्तानने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. पीसीबीचा दावा आहे की, दोन्ही कर्णधारांना टॉस दरम्यान हस्तांदोलन न करण्याची सूचना देण्यात आली होती, जे आयसीसीच्या आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे. या कारणास्तव, पीसीबीने पायक्रॉफ्ट यांना आशिया कप २०२५ मधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) प्रमुख मोहसिन नक्वी यांनी आयसीसीला या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.


