मुंबईतील अंधेरी येथे एक प्रकरण समोर आले आहे. लिफ्टमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झालेला एक खाजगी व्हिडिओ अचानक व्हायरल झाला. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. सदर महिला एका पुरुषासोबत लिफ्टमध्ये होती आणि कॅमेरा त्यांचे चित्रीकरण करत आहे याची तिला कल्पना नव्हती. त्यानंतर तिला हा व्हिडिओ पाहिला मिळाल्यावर तिला धक्काच बसला. त्यामुळे बाहेर जाताना काळजी घेणे गरजेचे आहे.
जर सीसीटीव्ही किंवा कॅमेरा प्रणाली सुरक्षितपणे व्यवस्थापित केली नसेल, तर तिचा सहज गैरवापर होऊ शकतो. कधीकधी, सॉफ्टवेअर अपडेट न करण्यासारख्या छोट्या चुकीमुळेही कॅमेरा हॅक होऊ शकतो. हॉटेल, ट्रायल रूम, चेंजिंग रूम आणि भाड्याच्या पार्टमेंटमधील छुपे कॅमेरे असल्याच्या बातम्या खूप सामान्य होत आहेत. लहान आणि स्वस्त तंत्रज्ञानामुळे असे स्पाय कॅमेरे बनवणे सोपे झाले आहे, जे स्मोक डिटेक्टर, चार्जर, घड्याळ, एअर व्हेंट किंवा भिंतीतील लहान छिद्रांमध्येही लपवता येतात.
लपवलेले कॅमेरे शोधण्यासाठी मोबाईल फोन देखील मदत करू शकतात. जर तुम्ही दिवे बंद करून तुमच्या मोबाईल फोनचा फ्लॅशलाइट भिंतींवर आणि उपकरणांवर टाकला, तर कॅमेऱ्याची लेन्स अनेकदा प्रकाश परावर्तित करते. जर तुम्हाला कुठेतरी एक लहान, चमकणारा ठिपका दिसला, तर तिथे कॅमेरा असू शकतो. खोलीत प्रवेश केल्यावर, आपल्या सभोवतालचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला विचित्र ठिकाणी ठेवलेली कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा एखाद्या वस्तूत लहान, गोल छिद्र दिसले, तर लक्ष द्या.
वाय-फाय स्कॅनिंगचा करू शकता वापर
अनेक कॅमेरे इंटरनेटलाही जोडलेले असतात. जर तुम्ही खोलीच्या वाय-फाय नेटवर्कला जोडलेले असाल, तर नेटवर्क स्कॅनिंग ॲप तुम्हाला नेटवर्कला किती उपकरणे जोडलेली आहेत हे पाहण्यास मदत करू शकते. जर तुम्हाला कोणतीही संशयास्पद उपकरणे आढळली, तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.


