नवी दिल्ली: नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) साठी नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. ज्याचा परिणाम काही प्रकरणांमध्ये दैनंदिन वापरकर्त्यांवरही होणार आहे. हे नवे नियम 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होतील. एनपीसीआयच्या म्हणण्यानुसार, या नियमांमुळे देशातील यूपीआय व्यवहारांची विश्वासार्हता, सुरक्षा आणि वेग वाढण्यास मदत होईल. हे नियम पेटीएम, गुगल पे, फोनपे किंवा इतर कोणतेही यूपीआय पेमेंट अॅप वापरणाऱ्या सर्व व्यक्तींना लागू होतील. हे बदल प्रामुख्याने या प्लॅटफॉर्मवर पेमेंट करणे, ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट, ऑटो पे मॅन्डेट आणि बॅलन्स चेकशी संबंधित असतील.
ऑगस्टपासून यूपीआयचे नवे नियम
- आता सर्व वापरकर्ते दिवसातून जास्तीत जास्त 25 वेळा एका फोन नंबरशी जोडलेले बँक खाते पाहू शकतील.
- युजर्सला दिवसातून 50 वेळा बॅलन्स चेक करण्याची मुभा असेल.
- वापरकर्ते केवळ तीन वेळा व्यवहाराची पेमेंट स्थिती पाहू शकतील आणि त्यांना प्रत्येक वेळी कमीतकमी 90 सेकंदांचे अंतर ठेवावे लागेल.
- वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ऑटोपे व्यवहारांसाठी निश्चित काल मर्यादा असेल.
एनपीसीआय नवीन नियम का आणत आहे?
एनपीसीआय यूपीआय सुलभ करण्यासाठी नवीन नियम आणत आहे, जेणेकरून या प्लॅटफॉर्मवरील अनावश्यक क्रियाकलापांना आळा बसू शकेल. नवीन आकडेवारीनुसार, भारतात दर महा सुमारे 6 अब्ज यूपीआय व्यवहार होतात.
अलीकडच्या काळात, विशेषत: एप्रिल ते मे 2025 दरम्यान देयके पाठविण्यात किंवा प्राप्त करण्यात अडथळे आणि विलंबाशी संबंधित तक्रारी वाढल्या आहेत. एनपीसीआयचे म्हणणे आहे की, याचे प्रमुख कारण म्हणजे बरेच वापरकर्ते सतत बॅलन्स तपासतात किंवा मिनिटं वारंवार पेमेंटची स्थिती तपासत राहतात. या कामांमुळे यंत्रणेवर अधिक भार पडतो आणि व्यवहारांच्या गतीवर परिणाम होतो. शेवटी, एनपीसीआयने निर्धारित केलेल्या या मर्यादा बऱ्याचपैकी लवचिक आणि व्यावहारिक आहेत, म्हणून या नवीन नियमांचा परिणाम वापरकर्त्यांवर सकारात्मक असेल.


