Pune News: आगामी महापालिका निवडणुकीचं वारं जोरदार वाहू लागलं आहे. भाजपने पुणे महापालिकेमध्ये 125 नगरसेवक निवडून आणण्याचे ध्येय ठेवल आहे. त्यासाठी संपूर्ण पक्ष कामाला लागला आहे. भाजपकडून 125 चा आकडा समोर आल्यानंतर आता विरोधी पक्षानी देखील दंड थोपटले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी देखील त्यांच निवडणूकीबाबतच गणित मांडल आहे. त्यात त्यांनी अर्धी संख्या कमी केली आहे. त्याशिवाय, त्यांनी पक्षफूटीवरही प्रकाश टाकला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे म्हणाले, पुणे महापालिकेची निवडणूक थोडीशी वेगळी आहे. 2017 मध्ये जेव्हा महापालिकेची निवडणूक झाली. त्यावेळी सर्व प्रमुख पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत कोणती युती, आघाडी झाली नव्हती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये फूट पडली असून आता या दोन्ही पक्षांमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत.
त्यामुळे सध्याची समीकरणे बदलली आहेत. मात्र, आकडेवारी करायची झाल्यास त्यावेळी शिवसेनेला आठ लाख 23 हजार मतदान झालं होतं. मनसेला तीन लाख 73 हजार मतदान झालं होतं. आणि एकसंघ असलेल्या राष्ट्रवादीला देखील 13 लाख मतदान झालं होतं. आणि त्यांचे जवळपास 42 नगरसेवक निवडून आले होते. आणि भाजपला (BJP) 22 लाख मतदान पडून त्यांचे 97 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे सध्या जर महाविकास आघाडी म्हणून ठाकरेंची शिवसेना , मनसे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्या एकत्रित मतांचा विचार केल्यास 50 टक्के प्रभागांमध्ये भाजपच्या मतांपेक्षा महाविकास आघाडीची मतं ही जास्त आहेत.
त्यामुळे तिन्ही पक्षांच्या मतांची जर बेरीज केली तर ती 16 ते17 लाखांपर्यंत जाते आणि याच गणित करायचं झालं तर यामुळे तब्बल 60 नगरसेवक हे महाविकास आघाडीचे निवडून येऊ शकतात. त्यामुळे भाजपाचे 100 ते 110 नगरसेवक निवडून येणार याबाबत स्वप्न पडत आहेत. ती परिस्थिती सध्या पुण्यामध्ये नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष एकत्रित निवडणूक लढल्यास भाजपाला 60 जागापर्यंत रोखणं शक्य होईल.
सध्या मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जोडला गेल्यास भाजपपेक्षा महाविकास आघाडीचे नगरसेवक हे जास्त निवडून येतील. तसेच काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून याबाबत राष्ट्रीय पातळीवर निर्णय होतील. मात्र, काँग्रेस पुण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आल्यास भाजप 40 ते 50 नगरसेवकांच्या वर जाऊ शकणार नाही असा दावा वसंत मोरे यांनी केला.


