निरोगी आरोग्य मिळवण्यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात कर्करोग आणि हृदयरोगाबरोबरच स्ट्रोक ही जगभरातील प्रमुख आरोग्य समस्यांपैकी एक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, दरवर्षी अंदाजे १.७ कोटी लोक स्ट्रोकने ग्रस्त असतात, त्यापैकी अंदाजे अनेकांचा मृत्यू होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
मेंदूला रक्तपुरवठा अचानक थांबला की ब्रेन स्ट्रोक होतो. यामुळे मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे काही मिनिटांतच त्यांचे नुकसान होते. स्टोकचे मुख्य दोन प्रकार आहेत. त्यात इस्केमिक स्ट्रोक ज्यामध्ये रक्ताची गुठळी मेंदूतील धमनीला अडथळा आणते, ज्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा रोखला जातो. दुसरा रक्तस्त्राव स्ट्रोक आहे, ज्यामध्ये रक्तवाहिनी फुटते, ज्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव होतो. रक्तदाब अचानक वाढल्याने हा होतो.
स्ट्रोक प्राणघातक असतो आणि त्यातून वाचणाऱ्यांना अर्धांगवायूचा धोका जास्त असतो. वृद्ध आणि प्रौढांमध्ये स्ट्रोक अधिक सामान्य असले तरी, ते मुलांना देखील प्रभावित करू शकतात. नवजात मुलांमध्ये देखील स्ट्रोकची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. स्ट्रोक ही एक जीवघेणी समस्या आहे. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये स्ट्रोक दुर्मिळ असतात. जेव्हा मुलांना स्ट्रोक येतो तेव्हा त्वरित उपचार घेतल्यास विविध गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
मुलांमधील स्ट्रोकची कारणे असतात वेगळी
मुलांमध्ये स्ट्रोकची कारणे सामान्यतः प्रौढांपेक्षा वेगळी असतात. जन्माच्या वेळी ऑक्सिजनची कमतरता, जन्मजात हृदयरोग, मेंदुज्वर किंवा कांजिण्यासारखे संक्रमण, रक्त जाड होणे किंवा डोक्याला गंभीर दुखापत होणे हे सर्व स्ट्रोकला कारणीभूत ठरू शकतात. स्ट्रोक झालेल्या प्रौढांपेक्षा मुलांना स्ट्रोकची लक्षणे वेगळी असू शकतात.
ही लक्षणे ठरू शकतात धोकादायक
स्ट्रोकच्या लक्षणांमध्ये वर्तन किंवा विचारसरणीत बदल, ऐकण्याच्या किंवा दृष्टीच्या समस्या, गिळण्यास त्रास होणे, शरीराच्या एका बाजूला स्नायू कमकुवत होणे (हेमिपेरेसिस) आणि शब्द बोलण्यात किंवा समजण्यात अडचण येणे यांचा समावेश आहे.


