पुणे : कोरेगाव पार्क आणि मुंढवा-बोपोडी भागातील ४० एकर सरकारी जमिनीच्या वादग्रस्त व्यवहाराने राज्याच्या राजकारणात धुमाकूळ घातला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्या ‘अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी’ कंपनीने तब्बल १८०० कोटी रुपयांच्या जमिनी ३०० कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे.
यात स्टॅम्प ड्युटीसाठी केवळ ५०० रुपये भरल्याचा आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या प्रकरणात ‘मास्टरमाईंड’ शीतल तेजवानी फरार असल्याची माहिती समोर आली असून, तिच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून तिचा परदेश प्रवास तपासण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे प्रकरण?
बावधन पोलिस ठाण्यात सहजिल्हा निबंधक संतोष अशोक हिंगाणे यांच्या तक्रारीवरून दिग्विजय अमरसिंह पाटील, शीतल किशनचंद तेजवानी आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर फसवणूक व विश्वासघाताचे कलम लावून गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या एफआयआरमध्ये पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले, दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि इतर आठ जणांचा समावेश आहे.
आरोप आहे की, १२ फेब्रुवारी २०२४ ते १ जुलै २०२५ दरम्यान, बोपोडीतील १३ एकर सरकारी कृषी जमिनीवर बेकायदेशीर मालकीचा आदेश देऊन स्टॅम्प ड्युटी ६ कोटींनी चुकवली गेली. या व्यवहारात २७२ व्यक्तींच्या वतीने शीतल तेजवानीकडे पॉवर ऑफ अॅटॉर्नी होती, जी अमेडियाकडे जमीन विकली. कंपनीने येथे आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची योजना आखली होती, पण एक लाख रुपयांच्या भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे शक्य, असा सवाल उपस्थित होतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “व्यवहार रद्द झाला असून, एक रुपयाही दिला गेला नाही. पार्थ स्वतंत्रपणे काम करतात, मी कधीच अधिकाऱ्यांशी बोललो नाही.” पार्थ यांचे नाव एफआयआरमध्ये नसले तरी दिग्विजय पाटील हे त्यांचे भागीदार आहेत. दोघेही अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी, महाराष्ट्र रिडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन एलएलपी आणि अमेडिया होल्डिंग्स एलएलपीचे डायरेक्टर्स आहेत.
शीतल तेजवानी फरार का?
सूत्रांनुसार, शीतल तेजवानीचा मोबाईल बंद असून, ती राहत्या पत्त्यावर सापडत नाही. पोलिसांना संशय आहे की, ती नवरा सागर तेजवानी (किंवा सूर्यवंशी) सोबत परदेशात फरार झाली. बावधन पोलिस इमिग्रेशन विभागाकडून माहिती घेत आहेत. हा प्रकार कुख्यात गुंड निलेश घायवळप्रमाणे असल्याचे म्हटले जात आहे. जमीन विक्रीतून मिळालेल्या ३०० कोटींचा भाग तिने हस्तगत केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे तिच्या शोधाशोधीला वेग आला आहे.
शीतल तेजवानी कोण? वादग्रस्त पार्श्वभूमी
1.शीतल तेजवानी आणि सागर तेजवानी हे पती-पत्नी आहेत.
2. सागर सुर्यवंशीने शितल तेजवानीसह कुटुंबियांच्या नावे घेतली 10 कर्जे
3. 41 कोटी रुपयांची 10 कर्जे घेताना सागर-शितलने सादर केली बनावट कागदपत्रे
4. सेवा विकास बँकेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शाखांतून उचलले कर्ज
5. ज्या कारणांसाठी कर्जे घेतली तिथे ती न वापरता दुसऱ्याच व्यवसायात वापरली
6. 2019 ला सहकार सह आयुक्त राजेश जाधवरांच्या ऑडिटमध्ये शितल-सागरचा घोटाळा उघड
7. सागर सुर्यवंशीने आणि शीतल तेजवानीने घेतलेली कर्जे मुद्दाम फेडली नाही
8. 31 मार्च 2021 पर्यंत कर्जांची रक्कम 60 कोटीच्या घरात
9. जानेवारी 2023 मध्ये ईडीकडून सागर सूर्यवंशीच्या घर आणि कार्यालयावर छापा
10. सागर सूर्यवंशीच्या 45 कोटींच्या मालमत्ता जप्त, मे 2023 मध्ये स्पेशल कोर्टात खटला
11. सागर सुर्यवंशीला ऑक्टोबर 2021मध्ये आधी सीआयडीने आणि नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक
12. जामिनावर बाहेर येताच सागर सूर्यवंशीला जून 2023मध्ये ईडीकडून अटक


