सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे वन्य हत्ती ओंकारवर (Omkar Elephant) सुतळी बॉम्ब आणि फटाके फेकण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तुळसाण नदीत शांतपणे आंघोळ करत असताना काही व्यक्तींनी त्याच्या जवळच ॲटम बॉम्ब फेकले, ज्यामुळे हत्ती भेदरला आणि पाण्यात आतल्या बाजूला पळत गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्राणीप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लहर उसळली असून, दोषींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
काही दिवसांपूर्वीच सावंतवाडी तालुक्यात ओंकार हत्तीला दांड्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. रात्रीच्या वेळी वन विभागाच्या टीमसमोर हा प्रकार घडला असून, मारहाणीनंतर हत्ती बिथरला होता. आता दुसऱ्या घटनेने तो अधिक चिडखोर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राणीप्रेमींनी म्हटले, “अशा छळामुळे हत्ती आक्रमक झाल्यास मनुष्यहानी होण्याचा धोका आहे. बॉम्बमुळे इजा झाल्यास जबाबदारी कोणाची?”
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ (WLPA) अंतर्गत हत्ती ही अनुसूची १ ची प्राणी असून, त्यांची शिकार किंवा जखमी करण्यास सक्त मनाई आहे. कलम ९ नुसार वन्य हत्तींना जखमी करण्यास बंदी आहे. याशिवाय प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० अंतर्गत अनावश्यक त्रास देणे गुन्हा आहे. प्राणीप्रेमींनी वन विभागाकडे सखोल चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली असून, या दोन्ही घटनांमध्ये दोषींना शोधण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे. वन विभागाने अद्याप याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.


