Delhi Blast Update: दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासात गुप्तचर संस्थांना मोठा धक्का बसवणारा खुलासा झाला आहे. जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेच्या फरिदाबाद-सहारापूर मॉड्यूलच्या चौकशीत उघड झाले की, आत्मघातकी हल्ल्याच्या कटात सहभागी दोन डॉक्टर डॉ. मुझम्मिल आणि डॉ. उमर यांनी त्यांच्या हँडलर्सशी संवाद साधण्यासाठी “Session” नावाच्या एन्क्रिप्टेड मेसेंजर अॅपचा वापर केला. या अॅपद्वारे संवाद साधण्यामागे संवादाचे कोणतेही डिजिटल पुरावे मागे राहू नयेत हा उद्देश होता. कारण या अॅपमध्ये मोबाईल नंबरची आवश्यकता नसते आणि चॅट मेटाडेटाही सेव्ह होत नाही, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना संवादाचा मागोवा घेणे अशक्य होते.
तुर्कीमध्ये गुप्त बैठक
सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीत डॉ. मुझम्मिल यांनी कबूल केले की त्यांनी जैशच्या हँडलर “अबू उक्का” याच्याशी प्रथम व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला होता. त्याचा नंबर तुर्कीचा (+90) होता. नंतर सुरक्षा कारणास्तव संवाद Session अॅपवर हलवण्यात आला. या दोघांनी 2022 मध्ये तुर्कीमध्ये हँडलरला प्रत्यक्ष भेट घेतल्याचेही समोर आले आहे. देशाच्या सुरक्षा एजन्सींना संशय येऊ नये म्हणून तुर्की हे ठिकाण निवडण्यात आले होते. सूत्रांच्या मते, जर हे दोन्ही डॉक्टर पकडले गेले असते तरी पाकिस्तान किंवा जैशशी थेट संबंध जोडता येऊ नयेत, अशी संपूर्ण योजना आखण्यात आली होती.
हेही वाचा – Bomb Threat: मुंबईसह 5 विमानतळं बॉम्बने उडवणार, दिल्ली स्फोटानंतरच्या धमकीने खळबळ
दोन टेलिग्राम गटांशी संबंध
तपासात पुढे उघड झाले की या हायब्रिड दहशतवादी मॉड्यूलचे संबंध दोन टेलिग्राम गटांशी होते. “उमर बिन खिताब” आणि “फरजान दारुल उलूम”. या दोन्ही गटांवर जैश-ए-मोहम्मद आणि मौलाना मसूद अझहर यांच्या जिहादला चिथावणी देणारी पोस्ट, पत्रे आणि जुन्या भाषणे शेअर केली जात होती. या संपूर्ण कटाचा उद्देश दिल्लीसह देशातील प्रमुख ठिकाणी दहशत माजवण्याचा होता, असे तपासातून समोर आले आहे. गुप्तचर संस्थांकडून या नेटवर्कशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध सुरू असून या तपासामुळे जैशच्या डिजिटल नेटवर्कचा मोठा भांडाफोड होण्याची शक्यता आहे.


