Pune Land Scam: पुण्यातील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याभोवती नवीन वाद निर्माण झाला आहे. संबंधित जमिनीचा व्यवहार त्यांच्या अमेडिया कंपनीमार्फत सुरू होता, असा आरोप होत असून, अजित पवारांनी हा व्यवहार रद्द केल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अद्याप पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने विरोधकांनी सरकार आणि भाजपवर तीव्र टीका सुरू केली आहे.
शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, “या प्रकरणात भाजपाकडून पार्थ पवारला वाचवले जात आहे.” त्यांनी सांगितले की, वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत आरोपांनंतर अजित पवारांनी “मी राजीनामा देतो आणि सरकारला बाहेरून पाठिंबा देतो” अशी भूमिका घेतल्याचा खुलासा झाला आहे. दानवे म्हणाले, ‘भाजपच अडचणीत आणते आणि भाजपच वाचवते. पार्थ पवार कंपनीचे डायरेक्टर असतानाही त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही, हे कसे शक्य आहे? व्यवहार झाला नाही म्हणून मुद्रांक शुल्क न भरण्याचे कारण दिले जाते, पण नियमाप्रमाणे शुल्क भरल्याशिवाय व्यवहार रद्द होत नाही. बावनकुळे यांची भूमिका चुकीची आहे. पार्थ पवारला भाजप वाचवत आहे.’
हेही वाचा – पार्थ पवार जमीन घोटाळ्याची चौकशी तुकाराम मुंढेंकडून? काँग्रेसची मोठी मागणी
त्यांनी पुढे म्हटले, “पार्थ पवार लहान बाळ नाहीत. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यांना ‘एखाद्याचा मुलगा’ म्हणून नव्हे, तर सामान्य नागरिक आणि गुन्हेगार म्हणूनच वागवले पाहिजे. तहसीलदारावर दोष टाकून मोठ्या अधिकाऱ्यांना आणि पार्थ पवारांना वाचवले जात आहे. एका तहसीलदाराकडे एवढी हिंमत असूच शकत नाही. जिल्हाधिकारी यामध्ये निष्क्रिय कसे राहू शकतात?”
दानवे यांच्या मते, मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय पार्थ पवारांना या प्रकरणात दिलासा मिळू शकत नाही. त्यांनी दावा केला की, “अजित पवारांनी सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी दाखवली होती, पण भाजपकडून संपूर्ण घटनाक्रम आधीच नियोजित होता.” या खुलाशामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून विरोधकांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.


