अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या चर्चेत आहेत. त्यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला, आणि त्याचे फोटो-व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. ‘साधेपणाने लग्न करा’ असा सल्ला देणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा एवढ्या थाटात का साजरा करतात, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला.
या सततच्या टीकेमुळे महाराजांना मानसिक त्रास सहन करावा लागला असून त्यांनी अखेर कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. त्यांचा एक भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात महाराज म्हणतात, “लोक आमच्या कष्टांकडे पाहत नाहीत, आमचं आयुष्य कसं गेलं हे समजून घेत नाहीत. आता माझ्या मुलीच्या साखरपुड्यात तीने कोणते कपडे घातले यावरून लोक कमेंट करतात. एवढी खालची पातळी गाठणं म्हणजे दुर्दैव आहे. आठ दिवसांपासून माझ्या कुटुंबावर, मुलीवर, मुलावर टीका केली जातेय. इतकं बोलल्यानंतर आता मीच थकलो आहे.”
View this post on Instagram
पुढे इंदूरीकरांनी म्हटलं आहे, “३१ वर्ष कीर्तन केलं, लोकांसाठी बोललो, पण आता वाटतं थांबायचं. माझ्या कुटुंबावर टीका झाली, तेवढ्याने माझं जगणं कठीण झालं. दोन-तीन दिवसात मी एक निर्णय घेणार आहे. कीर्तनं थांबवणंच योग्य वाटतं.” दरम्यान, इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा संगमनेर येथे पार पडला. त्यांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप (मुंबईतील बांधकाम व्यावसायिक) यांचा हा साखरपुडा राजेशाही थाटात झाला. रथावरून मिरवणूक, वारकरी वेशातील टाळकरी, पाहुण्यांची गर्दी या सोहळ्याची शोभा वाढवत होती. मात्र, महाराजांनी सत्कार, हार आणि शाल-श्रीफळ न स्वीकारता कार्यक्रम साधेपणाचं उदाहरण ठरावा, अशी काळजी घेतली होती. या प्रकरणामुळे इंदुरीकर महाराज भावनिक झाले असून त्यांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


