Bihar election results 2025: बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या निकालाचे चित्र स्पष्ट होऊ लागले असून, दुपारी 12.30 वाजेपर्यंत सर्व 243 जागांचे कल समोर आले आहेत. प्रारंभिक आकडेवारीनुसार एनडीएने मोठी आघाडी घेत 189 जागांवर आगेकूच केली आहे, तर महागठबंधन 50 जागांवर आणि अन्य उमेदवार 4 जागांवर आघाडीवर आहेत. या निकालांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा लक्षणीय प्रभाव दिसत असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे.
फडणवीस यांनी ज्या बिहारमधील मतदारसंघांत प्रचार केला, त्या 61 जागांपैकी तब्बल 49 जागांवर एनडीएचे उमेदवार पुढे आहेत. 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी त्यांनी सात जिल्ह्यांमध्ये सभा आणि रॅली घेतल्या होत्या. त्यांच्या प्रचाराचा मोठा परिणाम निवडणुकीत उमटल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, बिहारमधील या यशाचा आनंद साजरा करण्याची तयारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात सुरू आहे.
हेही वाचा – बिहार निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; NCP चे सर्व उमेदवार पिछाडीवर
फडणवीस यांनी प्रचार केलेले जिल्हे
- सारण – 10 पैकी 9 ठिकाणी एनडीए आघाडीवर
- सिवान – 8 पैकी 6 जागांवर एनडीए आघाडी
- पाटणा – 14 पैकी 11 मतदारसंघात एनडीए पुढे
- मुझफ्फरपूर – 11 पैकी 10 जागांवर एनडीए आघाडी
- सहरसा – 4 पैकी 3 जागांवर आघाडी
- खगडिया – सर्व 4 मतदारसंघात एनडीए आघाडीवर
- समस्तीपूर – 10 पैकी 6 जागांवर एनडीए आघाडी
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निकालामुळे एनडीएची ताकद आणखी वाढेल, असे सांगितले. केंद्र सरकार आधीच मजबूत आहे. बिहारचा हा निकाल एनडीएला अधिक घट्ट करणार आहे, असे ते म्हणाले. निवडणुकीनंतर आरोप-प्रत्यारोप होतील, पण पक्षाची एकजूट टिकून राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, निकाल येण्यापूर्वीच राहुल गांधी विदेशात गेल्याचे टोला त्यांनी लगावला. ईव्हीएम आणि मतदार याद्यांबाबत विरोधक पुन्हा संशय निर्माण करतील, असेही ते म्हणाले.
2020 च्या निवडणुकांचे निकाल
2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने 74, जेडीयूने 43, आरजेडीने 75, काँग्रेसने 19, एआयएमआयएमने 5, सीपीएम आणि सीपीआयने प्रत्येकी 2, तर बसपाने 1 जागा जिंकली होती.


