Anil Parab Mumbai Rada: मुंबईतील ताज लँड्स हॉटेल परिसरात शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप समर्थित संघटनांमध्ये मोठा राडा झाला. भारतीय कामगार सेनेचे सदस्य भाजपप्रणीत अखिल भारतीय कर्मचारी संघात ओढले जात असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला. याच कारणावरून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की व ओरडाओरडा सुरू झाला. घटनास्थळी पोहोचताच शिवसेना नेते अनिल परब यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्ये जाण्यास मज्जाव केल्याने परब संतापले. माझ्या कार्यकर्त्यांना मी कधीही अडवणार नाही, असे त्यांनी पोलिसांना सुनावले.
तथापी, चर्चेला फक्त काहीजणांना परवानगी देण्याच्या पोलिसांच्या भूमिकेवरही परब यांनी नाराजी व्यक्त केली. ‘सत्तेचा माज दाखवू नका, माझ्यासोबत किमान 25 कार्यकर्ते येणारच,’ असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेनेचा आरोप आहे की भारतीय कामगार सेनेतील कामगारांना चुकीच्या पद्धतीने भाजपच्या कर्मचारी संघात सामील केले जात आहे. सह्या घेताना फसवणूक झाल्याचा आरोपही परबांनी केला.
हेही वाचा – बिहारमध्ये NDA चा प्रचंड विजय! फडणवीसांनी केलेल्या प्रचाराने केली कमाल
या सर्व घडामोडींनंतर शिवसैनिकांनी हॉटेलबाहेर घोषणा देत निषेध व्यक्त केला. भाजपप्रणीत कर्मचारी संघटना आणि शिवसेनेच्या कामगार संघटनेमधील संघर्षामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.


