ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये आणखी एक वाद उसळला आहे. नव्या घडामोडीत, शिवसेना शिंदे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांना भाजपच्या माजी नगरसेवकाने मारहाण केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, शिंदे गटाचे शाखाप्रमुख हरेश महाडीक आणि उपविभागप्रमुख महेश लहाने यांच्यावर भाजपचे माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते नारायण पवार यांनी हात उगारल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 20 नोव्हेंबरच्या रात्री घडली असून पोलिसांनी प्राथमिक स्तरावर एनसी नोंदवली आहे.
शिंदे-भाजप तणाव वाढल्याची पार्श्वभूमी
या घटनेच्या काही तास आधीच शिंदे गटातील नाराजी उफाळून आल्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी 19 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत शिंदेंनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. कल्याण-डोंबिवलीसह अनेक ठिकाणी भाजपकडून “ऑपरेशन लोटस” राबवल्याचा आणि शिंदे गटातील अनेक माजी नगरसेवक फोडल्याचा आरोपही शिंदेंनी शाहांसमोर मांडल्याचे समजते. त्यामुळे दोन्ही पक्षांतील राजकीय समीकरणे ताणलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा – महायुतीतील नाराजी शिगेला? एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट
बीएसयूपी रजिस्ट्रेशन जाहीर; जल्लोषात वाद
ठाण्यातील बीएसयूपी घरांसाठी फक्त 100 रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर केल्यानंतर, शिंदे गटाच्या वतीने विविध इमारतींमध्ये जल्लोष करण्यात आला. पाच पाखाडी विभागातील लक्ष्मीनारायण इमारतीतही अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमादरम्यान भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार अचानक दाखल झाले आणि जल्लोषाबाबत प्रश्न उपस्थित करत वातावरण तापले. वाद वाढत गेल्यानंतर पवार यांनी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अद्याप पवार यांची प्रतिक्रिया मिळालेली नाही.
तणाव आणखी वाढण्याची शक्यता
या मारहाणीच्या घटनेमुळे शिंदे गट–भाजपमधील आधीच वाढलेला संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. ठाण्यातील ही घटना पुढील राजकीय घडामोडींवर मोठा प्रभाव टाकू शकते.


