रायगड: रायगडच्या राजकारणात नव्या कलाटणीची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा सनसनाटी दावा शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे. आधीच पालकमंत्रिपदावरून तटकरे आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र असताना या वक्तव्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. दळवी यांनी तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले की, “तटकरे कोणाशीही एकनिष्ठ राहिले नाहीत. ज्यांच्यासोबत त्यांनी काम केले, त्यांनाच फसवण्याचे काम त्यांनी केलं आहे. त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास चिटिंगवर आधारित आहे. आता त्यांची पावले भाजपकडे वळत आहेत आणि ते लवकरच भाजपमध्ये जाणार हे निश्चित आहे.”
दळवी यांनी तटकरे कुटुंबावर वैयक्तिक स्वरूपात टोलेबाजी करत म्हटलं की,, त्यांनी ज्यांनी उभं केलं त्यांनाच धक्का देणं ही त्यांची शैली आहे. रात्री ९ नंतर तटकरे कुटुंब फोन बंद करतात. त्यांना कोणाची पर्वा नसते. बॅगा भरून दिल्लीला जाणं ही त्यांची सवय झाली आहे, असा घणाघातही यावेळी दळवी यांनी केला. नाव न घेता त्यांनी आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्यावरही टीका केली. काही लोक सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात,” असा त्यांनी टोलाही लगावला.
हेही वाचा – शरद पवारांना मोठा धक्का! देशमुखांचा अचानक राजीनामा; आता कोणाला देणार साथ?
शिवसेना तटकऱ्यांच्या विरोधात एकत्र?
रायगडमधील राजकारणात शिवसेना शिंदे गट तटकऱ्यांचा विरोध करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. पालकमंत्रिपदावरून तटकरे विरुद्ध गोगावले असा वाद आधीच पेटलेला असताना, दळवींच्या सततच्या आरोपांमुळे दोन्ही बाजूंतील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना या आरोप–प्रत्यारोपांना आणखी वेग येईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. दरम्यान, दळवी यांनी केलेल्या आरोपांवर खासदार सुनील तटकरे काय प्रतिक्रिया देतात, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


