Kolkata Earthquake: पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी सकाळी भूकंपाचे सौम्य ते मध्यम धक्के जाणवताच अनेक जिल्ह्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले. कोलकात्यासह मालदा, नादिया, कूचबिहार, दक्षिण दिनाजपूर आणि हुगळी या जिल्ह्यांतही भूकंपाची नोंद झाली. त्रिपुराच्या काही भागातही हलके धक्के जाणवल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, हा भूकंप बांगलादेशातील तुंगीपासून सुमारे २७ किलोमीटर पूर्वेला झाला. स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३८ वाजता कंपनाची नोंद झाली. युरोपियन-भूमध्य भूकंप केंद्र (EMSC)ने दिलेल्या माहितीनुसार, हलक्या आफ्टरशॉक्सचीही नोंद आहे. ढाक्यात भूकंप जाणवल्यानंतर त्याचे परिणाम ईशान्येकडील प्रदेशात आणि कोलकात्यात पोहोचले.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातही कंप
आज सकाळी पाकिस्तानमध्येही ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. केंद्रबिंदू जमिनीपासून १३५ किलोमीटर खोलीवर असल्याने मोठे नुकसान टळले, तरीही अनेक नागरिकांनी घरे रिकामी करत सुरक्षित ठिकाणांचा शोध घेतला. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उत्तर भारताचा मोठा परिसर हा भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत सक्रीय झोनमध्ये मोडतो. भारतीय व युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्करीमुळे येथे वारंवार भूकंप होतात.
हेही वाचा – देश हादरला..! भूकंपाच्या धक्क्यामुळे सगळंच उद्ध्वस्त; ७ जणांचा मृत्यू, १५० हून अधिक जखमी
भूकंप का होतो?
पृथ्वीचा बाह्य थर हा १५ मोठ्या-लहान टेक्टोनिक प्लेट्सने बनलेला आहे. या प्लेट्स सतत मंद गतीने एकमेकांवर सरकतात. प्लेट्समध्ये ताण निर्माण होऊन अचानक सुटल्यास प्रचंड ऊर्जा बाहेर पडते आणि भूकंप होतो. प्लेट्सची टक्कर, घर्षण किंवा एकमेकांपासून दूर जाणे या सर्वांमुळे वेगवेगळ्या तीव्रतेचे भूकंप अनुभवायला मिळतात.


