Rajgurunagar Election: राजगुरुनगर नगरपरिषदेच्या एका प्रभागातील गावकऱ्यांनी निवडणुकीसाठी अनोखा प्रयोग केला आहे. पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी आणि मतांचे विभाजन रोखण्यासाठी संपूर्ण प्रभाग बिनविरोध ठेवण्याचे ठरवले, परंतु उमेदवारांची निवड लिलावाच्या माध्यमातून करण्याचा नियम त्यांनी ठरवला. १७ नोव्हेंबरला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हा प्रयोग यशस्वी झाला.
प्रभागात सर्वसाधारण आणि महिला राखीव अशा दोन जागा होत्या. इच्छुक उमेदवारांनी गावाच्या मंदिरात हजेरी लावली, आणि गावकऱ्यांनी ठरवले की जो सर्वाधिक बोली लावेल त्यालाच सर्वांचा पाठिंबा मिळेल. बाकी सर्वांनी आपले अर्ज मागे घ्यावेत, असे सर्वांनी मान्य केले.
हेही वाचा – लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत नवे राजकीय समीकरण! दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र; भाजपची डोकेदुखी वाढली
सर्वसाधारण जागेसाठी बोली अवघ्या काही मिनिटांत ९० लाखांवर पोहोचली, आणि शेवटच्या टप्प्यात ती १ कोटी ३ लाख रुपये झाली. महिला राखीव जागेसाठीही बोली २२ लाख रुपयांवर स्थिरावली. दोन्ही विजेत्या उमेदवारांना गावकऱ्यांनी एकमताने पाठिंबा दिला, आणि इतर सर्व इच्छुकांनी आपले अर्ज मागे घेतले. परिणामी, हा प्रभाग संपूर्णपणे बिनविरोध राहिला. सध्या गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाची राज्यभरात चर्चा होत आहे.


