Street Lights Stolen In Pune: पुणे शहरात चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिबवेवाडी परिसरातील सार्वजनिक पथदिवे चोरट्यांनी लंपास केल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुष्पमंगल कार्यालय ते संत एकनाथनगर या मार्गावर बसवण्यात आलेले पथदिवे आणि त्यांचे खांब काही अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याचा प्रकार 1 नोव्हेंबर 2025 रोजी घडला.
महापालिकेच्या बिबवेवाडी विभागाने या मार्गावर रहदारी सुरक्षित ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंना आधुनिक पथदिवे बसवले होते. मात्र, रात्रीची वेळ साधून चोरट्यांनी संपूर्ण साहित्य उखडून नेले. चोरी गेलेल्या खांब आणि दिव्यांची एकूण किंमत तब्बल 12 लाख रुपयांच्या घरात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अचानक प्रकाशव्यवस्था गायब झाल्याने रस्ता पूर्ण अंधारात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेवरही गंभीर परिणाम झाला आहे.
हेही वाचा –पुणे महापालिकेला 2 कोटी 81 लाखांचा भुर्दंड; भाजप नेत्याच्या धमकीमुळे प्रकल्प पडला बंद
घटनेची माहिती मिळताच विभागीय अभियंत्याने बिबवेवाडी पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, सार्वजनिक मालमत्तेची इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली चोरी पाहता हा प्रकार एखाद्या संघटित टोळीचे काम असल्याची शक्यता तपासात पुढे येत आहे. चोरट्यांनी पळवून नेलेले साहित्य शोधून काढणे आणि आरोपींना बेड्या ठोकणे हे सध्या पोलिसांसमोरचे मोठे आव्हान बनले आहे.


