मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) तज्ज्ञ डॉ. अमित भारद्वाज यांच्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबरला देशभरात हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत. दक्षिण अंदमान समुद्रावरील ‘वेलमार्क’ कमी दाब क्षेत्रासह कोमोरिन प्रदेश, नैऋत्य बंगालच्या उपसागर आणि श्रीलंका किनारपट्टीजवळ दुसरे कमी दाब क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे दक्षिण भारतात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचं संकट निर्माण होईल, तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढेल. IMD च्या विस्तारित अंदाजानुसार, २७ नोव्हेंबर पर्यंत राज्यात किमान तापमान सामान्यपेक्षा २ ते ४ अंशांनी खाली राहील.
दक्षिण भारतात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट
दोन वादळी प्रणाली एकाच वेळी सक्रिय होत असल्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत तामिळनाडूत २१ सें.मी. पेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला असून, केरळ आणि तामिळनाडूसाठी ऑरेंज अलर्ट जारी आहे.
लक्षद्वीप, अंदमान-निकोबार बेटे, रायलसीमा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीसाठी यलो अलर्ट असून, जोरदार पावसाची शक्यता आहे. चेन्नईसारख्या भागात २५ नोव्हेंबरला ७१ मिमी. पर्यंत पावसाची शक्यता असून, वादळी वाऱ्यांसह (३६-४४ किमी/तास) धोकादायक परिस्थिती राहील.
महाराष्ट्रात थंडी वाढणार; कोकणात दमटपणा
महाराष्ट्रात पश्चिम आणि मध्य भारताच्या तुलनेत थंडीचा कडाका वाढेल. २४ ते २७ नोव्हेंबर या काळात किमान तापमान २ ते ३ अंशांनी घसरण्याची शक्यता असून, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात गारठा तीव्र होईल. मुंबईसारख्या कोकण भागात सध्या दमट आणि उष्ण हवामान असले तरी, थंडी हळूहळू वाढेल. डिसेंबरमध्ये पुन्हा थंडीचा जोरदार कडाका अपेक्षित आहे. राज्यात अवकाळी पावसाचा धोका नसला तरी, नागरिकांनी थंडीसाठी तयारी करावी.
मच्छिमारांना इशारा
बंगालच्या उपसागरात सक्रिय प्रणालीमुळे समुद्र धोकादायक असल्याने, मच्छिमारांना पुढील ५ दिवस (२४ ते २८ नोव्हेंबर) खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आधीच समुद्रात गेले असल्यास तात्काळ परतावा.


