Ajit Pawar Speech: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी केवळ काहीच दिवस उरले असून, दोन डिसेंबरच्या मतदानाआधी प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सर्वच पक्षांचे नेते आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी आक्रमक पवित्रा घेत आहेत. पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार जोरदार मोर्चेबांधणी करत असून, मंचर नगर परिषदेतील महायुतीच्या सभेत त्यांचं भाषण खास चर्चेचा विषय ठरलं. मंचर नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून मोनिका बाणखेले मैदानात आहेत. त्यांच्या समर्थनार्थ अजित पवारांची सभा झाली. यावेळी पवारांनी त्यांच्या खास विनोदी शैलीत केलेल्या एका प्रश्नामुळे संपूर्ण सभेत एकच हशा पिकला.
सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, “मोनिका बाणखेले… पूर्वी मोनिका बेंड! माहेरही मंचरमध्ये आणि सासरही इथेच! मग सांगायला हरकत नाही… लव्ह मॅरेज आहे का?” त्यांच्या या प्रश्नाने क्षणभर सभेत हशा पिकला. लगेचच अजित पवारांनी हसतच स्पष्टीकरण दिले की, “सासर–माहेर जवळ असलं की लोक शंका घेतात म्हणून गंमतीने विचारलं!”सभेमध्ये उपस्थित सर्वजण या संवादाने अक्षरशः खदखदून हसले.
हेही वाचा – पुण्याचा पालकमंत्री म्हणून माझी मलाच लाज वाटली; अजित पवार नेमकं काय म्हणाले?
महायुतीतील संघर्ष पुन्हा चर्चेत
मंचर नगरपरिषदेच्या लढतीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र असले तरी त्यांच्यापुढे एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी संपूर्ण भाषणात एकनाथ शिंदे यांचं नाव टाळलं, ज्यावरून महायुतीतील दुरावा पुन्हा अधोरेखित झाला आहे. अजित पवार म्हणाले, “मंचरचा विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून मी, दिलीप वळसे पाटील, शिवाजी आढळराव पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद हे करू शकतात.” त्यांच्या या विधानात शिंदे गटाचा उल्लेख नसल्यामुळे राजकीय वर्तुळात या सभेची विशेष चर्चा सुरू आहे.


