पुणे : नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी फुरसुंगी येथे जाहीर सभा घेतली. येथील रस्त्यांची बिकट अवस्था पाहून त्यांनी स्वतःवरच संताप व्यक्त केला.
“रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, हे कसे कळतं? लोक कसे सहन करतात, माहिती नाही. पालकमंत्री म्हणून माझी मलाच लाज वाटली,” असे म्हणत त्यांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणावर टीका केली.
हडपसरचे आमदार चेतन तुपे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष सरोदे, माजी नगरसेवक गणेश ढोरे, अमोल हरपळे यांसह प्रभागातील उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.
उरुळी देवाची फाट्यापासून मंतरवाडीमार्गे फुरसुंगी गावठाण ते भेकराईनगर बस डेपोपर्यंत रोड शो आयोजित केला होता. सभेत पवार यांनी वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या खराब स्थितीवर भाष्य करत, “तुम्ही इथे कसे राहता, ही परिस्थिती कशी सहन करता?” असा सवाल उपस्थितांनाच केला.
नव्या महापालिकेची गरज
पवार म्हणाले, “फुरसुंगी-उरुळी देवाची परिसराचा सर्वांगीण विकास आमचा निर्धार आहे. पूर्वी पिंपरी-चिंचवड नगरपालिका होती, लोकसंख्या वाढल्याने महापालिका झाली आणि विकास झपाट्याने झाला. इथेही असेच होईल.”
वाढत्या लोकसंख्येमुळे प्रशासनावर ताण वाढत असल्याचे सांगत, हडपसर, मांजरी, फुरसुंगी, उरुळी देवाची, नगर रस्ता, वाघोली, लोणी काळभोर, उरुळी कांचन, होळकरवाडी, उंड्री-पिसोळी, वडकी या गावांना एकत्र घेऊन नवीन महापालिका उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.


