Pune Crime News: पुण्यातील बुधवार पेठ परिसरात गुरुवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. उंच इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेत एका १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला असता, मृत तरुणीची ओळख पटली असून तिचे नाव मानसी आहे. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली एक चिठ्ठीही पोलिसांच्या हाती लागली आहे, ज्यामध्ये तिने आपल्या टोकाच्या निर्णयामागील कारण नमूद केले आहे.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिले होते?
मानसीने घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी स्वत:वर घेत, “मी घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही” असं सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. तसेच, ती ज्या कामात होती त्याचा तिला कंटाळा आल्याने हे पाऊल उचलल्याचा उल्लेखही त्या चिठ्ठीत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मानसी काही दिवसांपासून याच इमारतीत राहात होती. गुरुवारी सायंकाळी अचानक तिने मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले.
घटना घडल्यानंतर आसपासच्या नागरिकांची गर्दी झाली आणि काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाकडून सुरू आहे. आत्महत्येच्या निर्णयामागील इतर कोणतेही कारण आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.


