हिंगोली : कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय रंगमंचावर सध्या आरोप-प्रत्यारोपाचा जोरदार खेळ सुरू आहे. शिंदे गट शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी महिलांसोबत अनैतिक संबंध आणि जायभाये नावाच्या महिलेच्या आत्महत्येशी संबंध जोडण्याचा धक्कादायक आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादात आता हे नवीन वळण आले असून, स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक तापला आहे.
मुटकुळे यांचे गंभीर आरोप
मुटकुळे यांनी कळमनुरीतील एका सभेत बोलताना म्हटले, “अश्लील शब्दांची सुरुवात कुणी केली, हा प्रश्न आहे. जायभाये नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली. तिच्या नवऱ्याच्या आणि स्वतःच्या संदर्भात कळमनुरीत चर्चा आहे. बांगर यांनी कळमनुरीत किती लोकांशी अनैतिक संबंध ठेवले, हे तपासले पाहिजे.
हे सर्व रेकॉर्ड आमच्याकडे आहेत.” याशिवाय, पूर्वीच्या ५० कोटी रुपयांच्या आरोपांनंतर आता विकासाच्या अभावावरही त्यांनी हल्ला चढवला: “कळमनुरीत विकास शून्य आहे. स्मशानात जायलाही रस्ता नाही. बांगर यांना विकासाचे व्हिजन नाही, फक्त पैशाच्या बळावर निवडणूक लढवतात. लोकांना पैसा कुठून आला हे माहिती आहे.”
बांगरांचा जोरदार पलटवार
या आरोपांवर संतोष बांगर यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत मुटकुळे यांना “शेण खाणारे” संबोधले. बांगर म्हणाले, “मुटकुळे यांना लोकांनी घरातही बोलावू नये. माझ्यासाठी सर्व महिलांना परस्त्री मातेसमान आहे. भाजप आमदार आमच्यावर अत्याचार करतात, माझ्या घरी शंभर पोलिस पाठवतात.” यापूर्वी बांगर यांनी मुटकुळे यांच्यावर पोलिस दबाव आणण्याचा आरोप केला होता, ज्यामुळे राजकीय तणाव वाढला आहे.


