Asim Sarode On Suresh Dhas: बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून राजकीय आणि गुन्हेगारी घडामोडींनी सर्वांनाचं चक्रावून टाकलं आहे. आता बीड जिल्ह्यात देवस्थानांच्या तब्बल 1000 कोटींच्या जमिनी हडपल्याचा आरोप समोर आल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर अलीकडेच प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यानंतर आता वकील असीम सरोदे यांनीही धक्कादायक दावा करत, “माझ्या जीवाला देखील आमदार सुरेश धस यांच्याकडून धोका आहे”, असा गंभीर आरोप केला आहे. यामुळे जिल्ह्यात राजकीय अस्थिरता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा – आमदार सुरेश धस यांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? स्वतःच दिली माहिती
राम खाडे सध्या पुण्यात उपचार घेत असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या समर्थकांकडून थेट भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर हल्ल्याचे सूतोवाच करणारे आरोप करण्यात आले आहेत. कारण, खाडे यांनीच देवस्थानांच्या जमिनींवरील कथित घोटाळा उघडकीस आणला होता. असीम सरोदे यांनी म्हटलं आहे की, “देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे वळवून त्या विकण्याचा मोठा घोटाळा झाला आहे. हे सर्व आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून केलं गेल्याचं राम खाडे यांनी सतत सांगितलं होतं. खाडे यांनी माहितीच्या अधिकारातून या प्रकरणातील अनेक महत्वाची कागदपत्रे मिळवली होती.”
सरोदे यांनी पुढे म्हटलं आहे की, “स्थानिक पोलिसांकडून कोणतीही योग्य कारवाई न झाल्याने आम्हाला थेट मुंबई येथील ईडी कार्यालयात तक्रार दाखल करावी लागली. या तक्रारीसोबत 200-300 हून अधिक पुरावे जोडले होते आणि त्यातून 1000 कोटींच्या जमिनींचा घोटाळा स्पष्ट दिसत होता.” सरोडे यांनी आता स्वतःच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर प्रकरणाचे स्वरूप आणखी गुंतागुंतीचे बनले आहे. देवस्थानांच्या जमिनींचा कथित गैरवापर, एक कोटींच्या वरची व्यवहार रक्कम आणि त्यात आमदाराचे नाव आल्याने भाजपची पुढील भूमिका काय असेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


