मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. हे प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, मनोज जरांगे पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी लावून धरल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे संबंध असल्याचा मुद्दा या नेत्यांकडून कायम उपस्थित केला जात आहे. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात वेगवेगळे आरोप करणारे आमदार सुरेश धस हेच मंत्री मुंडे यांना त्यांच्या निवास्थानी जाऊन भेटल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यादरम्यान स्वत: सुरेश धस यांनी समोर येत या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे मान्य केले आहे. तसेच आपण डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, ते म्हणाले आहेत. “मी स्वत: दिवसा मुंडे यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो. तब्येतीची विचारपूस आणि लढा या वेगळ्या गोष्टी आहेत. लढ्यामध्ये आम्ही कायम त्यांच्या विरोधातच उभे राहणार, फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो, तर त्यात गोंधळ करण्यासारखं काय आहे?,” असे आमदार सुरेश धस यावेळी बोलताना म्हणाले.
“परवा जेव्हा मी मुंडे यांना भेटायला गेलो होतो, ते केवळ त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी. एखाद्याच्या तब्येतीची चौकशी करणे, यात काही गैर नाही. सरपंच संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. तो कृपया जोडू नये”, असे सुरेश धस म्हणाले. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? या प्रश्नावर बोलताना आमदार धस म्हणाले की, “काहीही चर्चा झाली नाही. मी फक्त तब्येतीची विचारपूस केली आणि निघून आलो”.
पुढे बोलताना धस म्हणाले की, मी अजूनही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला नाही, हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. त्यांचा राजीनामा त्यांच्या पक्षासह इतर लोक मागत आहेत. त्यांचा राजीनामा घेणे किंवा नाही, हे सर्वस्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हातात आहे. माझा लढा सुरूच राहणार आहे. हे लोक फाशीवर जाईपर्यंत हा लढा सुरूच राहणारअसल्याचे धस यावेळी म्हणाले.


