नागपूर: येथील एका पाणीपुरीवाल्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. या पाणीपुरी विक्रेत्याने आपल्या ग्राहकांसाठी अनोखी ऑफर आणली आहे, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड पाणीपुरी खायला मिळणार आहे. पण त्यासाठी ग्राहकांना एकदाच ९९ हजार रुपये द्यावे लागणार आहेत. अनेकजण या पाणीपुरीवाल्याच्या मार्केटींग कल्पनेचे कौतूक करत आहेत.
नागपूर येथील पाणीपुरी विक्रेते विजय मेवालाल गुप्ता यांनी लोकप्रिय स्ट्रीट स्नॅक्स विकण्यासाठी ही अनोखी ऑफर आणली आहे, ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनलिमिटेड पाणीपुरी खाण्यासाठी ग्राहकाला एकरकमी ९९ हजार रुपये मोजावे लागणार आहे. यासाठी विक्रेता आणि ग्राहक यांच्यात कायदेशीर करार देखील केला जाईल, असेही सांगितले जात आहे. तसेच महिला आणि मुलींसाठी विशेष सवलत देण्यात येत आहे.
व्हायरल ऑफरमुळे अनेक पाणीपुरीप्रेमींनी आपले कॅल्क्युलेटर उचलून हा सौदा विक्रेत्याला फायदेशीर आहे की ग्राहकाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांनी त्याच्या मार्केटिंग कौशल्याचे कौतुक केले. तर, काहींनी पाणीपुरीसाठी आकारल्या जाणाऱ्या हास्यास्पद रकमेची खिल्ली देखील उडवली.
या पाणीपुरीवाल्याबद्दल माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. एका व्यक्तीने म्हटले आहे की, ही ऑफर ग्राहकांच्या आयुष्यासाठी आहे की दुकानदारांच्या? तर दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, जर तुम्ही दररोज १९० रुपयांची प्लेट खात असाल तर, २७ वर्षे दररोज पाणीपुरी खाऊ शकतात. अनेक जणांनी या ऑफरच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ग्राहक मिळवण्यासाठी केलेले नाटक आहे, असे म्हटले आहे. तसेच बँकेत ९९ हजार रुपयांची मुदत ठेव करा आणि दररोज २५ रुपये व्याज मिळवा, असे एकाने म्हटले आहे.


