Ratnakar Gutte On Dhananjay Munde: अजित पवार गटाचे नेते आमदार धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव आल्यानंतर मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. आता गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलेला खळबळजनक खुलासा नव्या राजकीय वादळाला कारणीभूत ठरत आहे. गुट्टे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या सभेत बोलताना दावा केला की, “इंदूरमधील एका हॉटेलमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता होती. पण आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराजांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना वाचवले.” तसेच मुंडे कोणत्या हॉटेलमध्ये थांबले होते, याची माहिती स्वतःकडे असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र ती माहिती उघड न करता, ‘तुमचा निकाल लावल्याशिवाय मी थांबणार नाही, असा थेट इशारा गुट्टेंनी दिला. त्यांच्या या विधानाने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
गुट्टेंनी पुढे आरोप केला की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, विविध उमेदवारांना उभे केले आणि मोठी ताकद लावली. मात्र मतदारांच्या पाठिंब्यामुळेच आपण मोठ्या मताधिक्याने विजयी झालो, असे ते म्हणाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी गंगाखेडमध्ये सभा घेऊन रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली होती. त्यांनी गुट्टेंवर शेतकऱ्यांच्या नावावर 1600 कोटींचं कर्ज उचलल्याचा आरोप करून त्यांची तुलना नीरव मोदींशी केली होती. या आरोपांना उत्तर देताना गुट्टेंनी अधिक आक्रमक सूर लावत मुंडेंना प्रत्युत्तर दिले.
तुम्ही मला नीरव मोदी म्हणता, पण प्रत्यक्षात विजय मल्ल्याचे छंद आणि तुमचे छंद एकसारखे आहेत, असा टोला गुट्टेंनी लगावला. त्याचबरोबर, मी कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाऊ शकतो. पण धनुभाऊ, तुमचा हिशेब न करता मी शांत बसणार नाही, असे वक्तव्य करून त्यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे.


