Sayaji Shinde On Tapovan Tree Cutting: नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेवर सुरू असलेल्या वृक्षतोडीवर पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी आणि राजकीय नेते एकत्र उभे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेता आणि वृक्षमित्र सजाजी शिंदे यांनीही आपली स्पष्ट भूमिका मांडली असून, ‘ज्यांच्यासाठी झाडे तोडली जात आहेत, त्या साधु-संतांना तरी झाडं तोडलेलं पटेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
झाडं तोडून दुसरी झाडे लावणे ही कल्पना चुकीची
दरम्यान, तपोवनातील 1,150 एकरांवर साधु-महंतांसाठी भव्य साधूग्राम उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, या कामासाठी जवळपास 1,800 झाडे तोडली जात आहेत. यामुळे वृक्षप्रेमी आणि पर्यावरणवाद्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया निर्माण झाली आहे. सजाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, 10 वर्षांच्या आतची झाडे तोडणे आणि त्याऐवजी दुसरी झाडे लावणे ही कल्पना चुकीची आहे. आपण जगतो ते फक्त झाडांमुळे जगतो. जर आपल्या आई-बापांवर हल्ला केला जात असेल तर आपण गप्प बसणार आहोत का? असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
या निषेधात शनिवारी, 6 डिसेंबर रोजी सकाळी मनसेकडून जाहीर निषेध नोंदवण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी संघ आणि अनेक कलाकार या निषेधात सहभागी होणार असून, सर्व वृक्षप्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सजाजी शिंदे यांनी आपल्या वक्तव्यांमध्ये म्हटले की, झाडं फक्त पर्यावरणाचे स्रोत नाहीत, तर ते आपले पालक आहेत. कोणत्याही साधु-संतांचा अपमान न करता झाडं तोडणे कुणालाही स्वीकार्य ठरणार नाही. त्यांनी ठामपणे सांगितले की झाडांचे संरक्षण करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि या वृक्षतोडीवर सर्वांनी सक्रियपणे विरोध नोंदवावा.


