Sanjay Gaikwad : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत वातावरण चांगलंच तापलं आहे. मुंबईत जिंकायचं असेल तर महायुतीच झाली पाहिजे. जर महायुती झाली नाही, तर आम्ही आमचा स्वतंत्र महापौर बसवू, असं इशारा शिवसेना (शिंदे गट) चे आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. त्याचवेळी भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांच्या भाजप देवाभाऊमय आहे, महाराष्ट्रातील इतर पक्षही फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात या वक्तव्यावरही गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
महापौरपदावर शिंदे सेनेचा दावा ठाम
संजय गायकवाड म्हणाले, मुंबईत जिंकायचं असेल तर महायुती आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीत महायुती झाली नाही, त्याचा फटका आम्हाला बसला आणि फायदा महाविकास आघाडीला झाला. ही चूक पुन्हा होऊ देणार नाही, याची काळजी दोन्ही बाजूचे नेते घेतील अशी अपेक्षा आहे. पण जर महायुती झालीच नाही, तर आम्ही स्वबळावर किंवा इतर कोणाशीही हातमिळवणी करून आमचा महापौर बसवू.
आम्ही २०२२ मध्ये जी राजकीय क्रांती केली, ती कुणाच्या इशाऱ्यावर नव्हे तर बाळासाहेबांच्या विचारांवर केली होती, असंही संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. गायकवाड पुढे म्हणाले, भाजपकडे जास्त जागा असतील तर त्यांचाच महापौर होईल, आमच्याकडे जास्त जागा आल्या तर आमचा होईल. ही लोकशाही आहे. पण महायुती झालीच तरच मुंबई जिंकता येईल, हे भाजप नेत्यांनीही मान्य करावं.”
लोढांच्या ‘देवाभाऊ’ वक्तव्यावर खोचक टीका
मंगलप्रभात लोढा यांनी नुकताच म्हटलं होतं की, “भाजप देवाभाऊमय आहे आणि महाराष्ट्रातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीस कसे चालतील हे ठरवतात.” यावर गायकवाड यांनी थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, लोढाजींचं हे वैयक्तिक मत असू शकतं. पण सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे १०० टक्के खोटं आहे. आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि बाळासाहेबांच्या विचारांवर चालतो. आमचा अजेंडा वेगळा आहे. आम्ही जे सरकारमध्ये आलो ते कुणाच्या कृपेने नव्हे, तर जनतेने दिलेल्या कौलामुळे आणि आमच्या क्रांतीमुळे आलो,” असं गायकवाड यांनी सुनावलं.


