Veda Sarfare: रत्नागिरीच्या वेदा सरफरे या दीड वर्षांच्या चिमुरडीने बालवयात राष्ट्रीय पातळीवर आपली जलतरण कौशल्याची चमक दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आश्चर्य म्हणजे, वेदाचा पाण्यातील प्रवास अवघ्या नऊ महिन्यांची असताना सुरू झाला होता. इतक्या कमी वयात पोहण्याचा सराव सुरू करणारी वेदा, आज भारताची सर्वात लहान जलतरणपटू ठरली आहे.
नऊ महिन्यांपासून पाण्याशी मैत्री
साधारणपणे बाळांचे पाय पाळण्यात दिसतात, अशी म्हण आपल्याकडे आहे. ही म्हण वेदाला लागू पडते. वेदा आपल्या मोठ्या भावाच्या सरावासाठी आईसोबत जलतरण तलावावर येत असे. यावेळी तिला पाण्याचे कुतूहल वाटत असे. ती पाण्यातील हालचाली उत्सुकतेने पाहायची. एके दिवशी प्रशिक्षक महेश मिलके यांनी तिला पाण्यात सोडून पाहिले, आणि अपेक्षेच्या विरुद्ध वेदा रडलीच नाही. उलट पाण्यात हातपाय मारत तिने जणू काही पाण्याशी लगेच मैत्री केली. तेथून तिचा जलतरणाचा पाया अधिक भक्कम होत गेला.
१ वर्ष ९ महिन्यांतच मोठा पराक्रम
वेदाचे कौशल्य पाहून प्रशिक्षकांनी तिचा नियमित सराव सुरू केला. केवळ १ वर्ष ९ महिन्यांची असतानाच तिने अवघड मानले जाणारे १०० मीटर अंतर १० मिनिटे ८ सेकंदात पूर्ण केले. या कामगिरीमुळे तिची नोंद इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली असून ती भारतातील सर्वात लहान जलतरणपटू बनली आहे.
कुटुंबाचा आधार आणि जिद्दीचा प्रवास
वेदाचा मोठा भाऊ रूद्र हा राज्यस्तरीय जलतरणपटू आहे. त्याच्यासोबत आई पायल सरफरे रोज तलावावर जात असताना वेदाला प्रेरणा मिळत गेली. रूद्रच्या सरावादरम्यान तलावाकडे पाहत वाढलेली वेदा हळूहळू पाण्याशी अधिक आत्मीयतेने जोडली गेली. आज वेदा आत्मविश्वासाने तलावाच्या काठावर उभी राहते आणि पाण्यात झेपावताना तिच्या चेहऱ्यावर दिसणारा निर्धार तिच्या जिद्दीची साक्ष देतो.
हेही वाचा – PMC Election: पुण्यात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! अनेक बड्या नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश
रत्नागिरीची शान ठरलेली चिमुकली
जिद्द, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन यांच्या संगमाने वेदाने सिद्ध केले की वय हे कौशल्याला अडथळा नसतो. रत्नागिरीच्या या चिमुकलीचा जलतरणातील प्रवास सर्वांना प्रेरणा देणारा ठरत आहे.


