Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस, नेत्यांची कुरघोडी आणि पदाधिकाऱ्यांची पळवापळवी अखेर संपणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी उशीरा दीड तास बंद दाराआड झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत महायुती एकत्रितपणे राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लढवण्यावर एकमत झाले. या निर्णयामुळे मुंबई, ठाणे यांसह राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी महायुतीची एकजूट मजबूत होणार आहे.
या बैठकीसाठी प्रदेश भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. शिवसेनेच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रानुसार, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकत्र लढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. पुढील दोन-तीन दिवसांत प्रत्येक महानगरपालिकेसाठी जागावाटप, उमेदवार निवड आणि इतर मुद्द्यांवर स्थानिक पातळीवर चर्चा सुरू होईल, अशी माहिती मिळाली आहे.
महायुतीच्या या निर्णयामागे काही मुख्य कारणे आहेत. प्रथम, गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये नेत्यांचे पक्षबदल होत होते, ज्यामुळे शिवसेनेत असंतोष वाढला होता. या बैठकीत यावरही चर्चा झाली असून भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षात जाण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली. हे निर्णय महायुतीच्या एकजुटीसाठी महत्त्वाचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरू असल्याने महायुतीला एकत्र राहण्याची गरज भासली. मविआमध्ये मनसेवरून खलबत सुरू असल्याने महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे.


