Shital Tejwani: मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शीतल तेजवानीवर चौकशीदरम्यान आणखी गंभीर आरोपांच्या मालिका समोर येत आहेत. तपास जसजसा व्यापक होत आहे, तसतसे तिचे अनेक गुप्त व्यवहार उघडकीस येत असून, आता त्यांचे नाव बॉलिवूडपर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तेजवानीचा बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबतचा आर्थिक वाद प्रकाशझोतात आला आहे. तब्बल 50 लाख रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी तिने रणबीर कपूरविरुद्ध दिवाणी दावा दाखल केल्याचे उघड झाले आहे.
हेही वाचा – ‘मला बसायला खुर्ची द्या…’; कोर्टात शीतल तेजवानीची मग्रुरी
रणबीर कपूरवर कराराचा भंग केल्याचा दावा
पुण्यातील ट्रॅम्प टॉवरमधील एका फ्लॅटच्या भाडेकराराशी हा वाद संबंधित असून, कपूरने करारातील काही महत्त्वाच्या अटींचा भंग केला असल्याचा दावा तेजवानीने केला आहे. विशेषत: करारातील ‘लॉक-इन पिरियड’ पाळला नसल्याने तिला आर्थिक तोटा झाला, असा आरोप तिच्याकडून करण्यात आला आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित असून पुढील सुनावणी 5 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.
हेही वाचा – Sheetal Tejwani: शीतल तेजवाणीच्या घरी पुणे पोलिसांची झाडाझडती, महत्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता
मुंढवा जमीन घोटाळ्यात नवे नाव संशयाच्या भोवर्यात
दरम्यान, या मोठ्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास अधिक खोलवर जात असताना ‘अमेडिया’ कंपनीतील 1 टक्के भागधारक दिग्विजय पाटील यांच्यावरही संशय वाढला आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले असून, ते हजर राहतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शीतल तेजवानी आणि सूर्यकांत येवले यांच्यावर या प्रकरणात आधीच गुन्हे नोंद असून तपासाची गती वाढवण्यात आली आहे. तसेच रवींद्र तारू यांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार संलग्न असलेल्या अमेडिया कंपनीपर्यंत पोहोचू शकतात का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. तपासाची दिशा कोणत्या दिशेने जाते, याकडे आता राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.


