Ladki Bahin Yojana: राज्यातील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ विधानसभा निवडणुकीत प्रचंड लोकप्रिय ठरल्यापासून अद्यापही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. लाडक्या बहिणींच्या पाठिंब्यामुळेच महायुतीला यश मिळाल्याचा दावा सत्ताधारी सातत्याने करत आहेत आणि ही योजना कधीही थांबणार नाही, अशी हमी देखील दिली जात आहे. त्याउलट विरोधकांचा आरोप आहे की या योजनेमुळे सरकारी खजिन्यावर मोठा आर्थिक बोजा वाढत असून, जाहीर केलेल्या २१०० रुपयांच्या अतिरिक्त सहाय्याबाबत सरकार सतत मौन बाळगते आहे. या मुद्द्यांवर आज विधानसभेत मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार जयंत पाटील यांच्यात रंगलेली चर्चा विशेष ठरली.
हेही वाचा – लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती! लाडक्या बहिणींसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी घोषणा; नेमकं काय म्हणाले?
शंभुराज देसाई आणि जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी
सभागृहातील चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये शब्दांची विनोदी, मुद्देसूद जुगलबंदी पाहायला मिळाली. “ही योजना सुरू करणारे व्यक्ती आता ‘२ नंबर’वर गेले,” असे शंभूराज देसाई म्हणाल्याचा उल्लेख करत जयंत पाटील यांनी टोला लगावला. 1 नंबरचा माणूस इथे नाही म्हणून शंभूराज आता 1 आणि 2 नंबरबाबत बोलत आहेत, असेही पाटील यांनी म्हटले. यावर देसाई यांनी लगेच पलटवार करत सांगितले की, “एकनाथ शिंदे कायम ‘२’ नंबरवर राहतील असे नाही, परिस्थतीनुसार पदे बदलत असतात.”
हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील महिलांना लखपती बनवणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
दरम्यान, योजनेंतर्गत लागू केलेल्या नवीन नियमावलीबाबतही सभागृहात प्रश्नोत्तरांची मालिका सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी आरोप केला की, निवडणुकीच्या वेळी या अटी स्पष्ट सांगितल्या नव्हत्या. काहींनी चुकीचा लाभ घेतला, मग त्यांच्या विरोधात कारवाई होणार का? आणि योजना जड जाऊ लागल्यानेच KYC प्रक्रिया आणली का?
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
यावर महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, पहिल्या शासन निर्णयापासूनच २ कोटी ६३ लाख अर्जदारांची तपासणी सुरू आहे. विविध विभागांमध्येही डेटा पडताळणी चालू आहे. पारदर्शकतेसाठी ई-KYC लागू केली आहे. पण जयंत पाटील यांनी पुन्हा आक्षेप घेतला की, “KYC मध्ये १३ नवीन अटी घातल्या आहेत, या आधी नव्हत्या.” त्यावर तटकरे यांनी स्पष्ट केले की, “अनेक महिलांचे स्वतःचे बँक खाते नसल्याने कर्त्या पुरुषांचे खाते वापरले गेले. याच कारणासाठी KYCची आवश्यकता निर्माण झाली. जर आर्थिक लाभ प्रत्यक्षात पुरूष घेत असतील तर अशा प्रकरणांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


