Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana: राज्यात महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असून, या योजनेचा परिणाम विधानसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी लागू झालेल्या या उपक्रमाने महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली. त्याचा मोठा फायदा महायुतीला निवडणुकीत झाला. महिलांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केल्याचा दावा सत्ताधारी पक्षांकडून केला जातो.
प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा सन्माननिधी 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, वर्षभर उलटूनही या वाढीबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. सध्या आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांच्या बँकामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जात आहेत. ही योजना सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांपैकी एक मानली जाते.
हेही वाचा – ‘अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच…’; देवेंद्र फडणवीसांचा निवडणूक आयोगावर आक्षेप
फडणवीसांनी विरोधकांना दिले उत्तर
या योजनेवर सतत टीका करणाऱ्या विरोधकांनी वारंवार आरोप केला होता की, निवडणुकीनंतर सरकार ही योजना बंद करेल. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर थेट प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, ५ डिसेंबरला आमच्या सरकारच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत आहे. निवडून आल्यावर लाडकी बहीण योजना बंद होईल असे अनेकांनी भाकीत केले. पण वर्ष झाले तरी योजना थांबलेली नाही. उलट, ही सुविधा पुढेही सुरूच राहणार आहे.
‘लखपती दीदी’चे नवे लक्ष्य
फडणवीसांनी यावेळी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले, ‘आता आमचे पुढील उद्दिष्ट लखपती दीदी योजना सुरू करण्याचे आहे. राज्यातील लाखो महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, ही आमची भूमिका आहे.’


