सोलापूर: ग्रामपंचायत हद्दीत केलेल्या इलेक्ट्रिक कामाचे बिल मंजूर करण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात एक लाखाची लाच मागून 60 हजार रुपये घेताना माळशिरस पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शशिकांत सयाजी चौगुले (पद कनिष्ठ अभियंता, ता. पंचायत समिती, माळशिरस) असे त्या अभियंत्याचे नाव आहे.
यातील तक्रारदारांच्या पत्नीच्या नावे शासकिय इलेक्ट्रिकल कामे करण्यासाठीचा शासकीय परवाना आहे. त्यासाठी त्यांनी एक फर्म स्थापन केली आहे. तक्रारदार फर्मच्या वतीने पिलीव ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या रोडलाईटच्या कामाच्या बिलाच्या अनुषंगाने पाठपुरावा करत होते. ते कनिष्ठ अभियंता शशिकांत चौगुले यांच्याकडे गेले असता त्यांनी फळपणी ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या कामाचे बिल मिळवून देण्याच्या मोबदल्यात 34 हजार तर पिलीव ग्रामपंचायत हदीत केलेल्या कामाच्या बिलासाठी करत असलेल्या मदतीच्या मोबदल्यात 33 हजार असे एकूण 67 हजारांची मागणी केली. शिवाय इतरत्र केलेल्या कामाचे बील भविष्यात मिळवून देण्यासाठी लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. चौगुले यांना तक्रारदाराकडून 60 रूपये घेताना माळशिरस पंचायत समिती कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले.


