G Ram G Bill: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान गुरुवारी लोकसभेत मनरेगा ऐवजी ‘जी-रामजी’ (रोजगार आणि उपजीविकेसाठी बदली) अर्थात भारत रोजगार आणि उपजीविकेसाठी हमी मिशन (ग्रामीण) विधेयक मोठ्या गदारोळात मंजूर करण्यात आले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी विधेयकाला तीव्र विरोध करत त्याची पाने फाडून संसदेच्या वेलीत फेकली. अधिवेशनादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृहाचे कामकाज ठप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोंधळातही हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
शिवराज सिंह चौहान यांचे आक्रमक प्रत्युत्तर
विधेयकावर उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसने कधीही महात्मा गांधींचे विचार ऐकले नाहीत. आम्ही गांधीजींवर विश्वास ठेवतो. गांधीजींनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विसर्जित व्हावी असे मत व्यक्त केले होते, असे सांगत त्यांनी पुढे म्हटले की, ज्या दिवशी काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला, त्याच दिवशी संविधानाची हत्या झाली.
हेही वाचा – Pradhya Satav Join BJP: काँग्रेसला हिंगोलीत मोठा धक्का! डॉ. प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
मनरेगामध्ये भ्रष्टाचार, निधीचा गैरवापर: शिवराज
शिवराज सिंह चौहान यांनी आरोप केला की, काँग्रेस सरकारने मनरेगा योजनेला भ्रष्टाचाराच्या हाती सोपवले. काँग्रेसच्या तोंडावर राम आहे, पण हातात चाकू आहे, असा घणाघात करत त्यांनी निधीच्या गैरवापराचा आरोप केला. ते म्हणाले की, मोदी सरकारने मनरेगामधील अनेक त्रुटी दूर केल्या असून, जी-रामजी विधेयकामुळे शेतकरी आणि गरीब घटकांना थेट लाभ होणार आहे. आमच्या सरकारने निधी विकास प्रकल्पांसाठी वापरला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रियंका गांधींवर निशाणा
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्या टीकेला उत्तर देताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, महात्मा गांधींच्या नावाऐवजी काँग्रेसने सरकारी योजनांची नावे नेहरू कुटुंबाच्या नावावर ठेवली. हे गांधीजींच्या विचारांशी विश्वासघात आहे.
विरोधकांचा निषेध कायम
विधेयक मंजूर होत असतानाही विरोधी पक्षांचा गदारोळ सुरूच राहिला. विरोधकांनी हा कायदा गरीबविरोधी असल्याचा आरोप करत सभागृहात निषेध नोंदवला. तरीही सरकारने विधेयक मंजूर करून पुढील प्रक्रियेसाठी पुढे नेले.


