Mahayuti Alliance In BMC: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात झालेल्या दुसऱ्या फेरीच्या बैठकीत २२७ पैकी १५० जागांवर सहमती झाली आहे. भाजप आमदार अमित साटम यांनी या बैठकीनंतर महायुतीचा ‘विजयाचा फॉर्म्युला’ स्पष्ट केला.
भ्रष्टाचाराचा विळखा तोडणे हेच लक्ष्य
पत्रकार परिषदेत बोलताना अमित साटम यांनी उद्धव ठाकरे गटावर थेट निशाणा साधला. ‘गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेला लुटणाऱ्यांना सत्तेतून बाहेर खेचणे हेच आमचे मुख्य सूत्र आहे. मुंबईचा चेहरा बदलण्याचा आणि मतांच्या राजकारणासाठी शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखण्यासाठी महायुती सज्ज आहे, असे साटम म्हणाले. २२७ जागांवर महायुती ताकदीने लढणार असून १५० पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचाच महापौर बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – महापालिका रणधुमाळीला सुरुवात! प्रचारासाठी फक्त 12 दिवस; प्रत्येक दिवस ठरणार निर्णायक
उर्वरित ७७ जागांचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती
ज्या ७७ जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही, त्याबाबतची सांख्यिकीय माहिती पुढील दोन दिवसांत पूर्ण केली जाईल. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. मंत्री उदय सामंत यांनीही याला दुजोरा दिला असून, उमेदवार जाहीर झाल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे स्पष्ट केले.
नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादीसोबत अंतर?
या संपूर्ण चर्चेत महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) काहीसे बाजूला ठेवल्याचे दिसून आले. याबाबत स्पष्टीकरण देताना साटम म्हणाले, नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत आम्हाला कोणतेही देणे-घेणे नाही. त्यांच्यावर असलेले आरोप गंभीर आहेत. जोपर्यंत ते निर्दोष सुटत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी संबंध ठेवणार नाही. जर राष्ट्रवादीने मलिकांऐवजी दुसरा चेहरा समोर आणला, तरच युतीबाबत विचार होऊ शकतो, असे संकेतही त्यांनी दिले.


