नाशिक : नाशिक जिल्ह्यात ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय वर्तुळाला हादरा देणारी घटना घडली आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास किसन चौधरी (वय ५२) यांचा मृतदेह पळसे-शिंदे परिसरातील एका नाल्यात आढळून आला. गेल्या पाच-सहा दिवसांपासून ते बेपत्ता होते. या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, राजकीय नेत्यांमध्येही खळबळ उडाली आहे.
११ डिसेंबर रोजी सकाळी कैलास चौधरी कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना चौकशी केली; मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिस शोध घेत होते.
गुरुवारी (१८ डिसेंबर) सकाळी पळसे गावाजवळील पुलाखाली नाल्यात मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. बातमी मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्राथमिक तपासात तो बेपत्ता कैलास चौधरी यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.
पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, हा अपघाती मृत्यू आहे की घातपात, याचा सखोल तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. निवडणुकीच्या काळात राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीचा असा संशयास्पद मृत्यू झाल्याने नाशिक जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. तपासात काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


