Mahayuti Conflict: फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने या मुद्द्यावरून भाजपवर थेट आणि बोचरी टीका केली आहे. ‘आमच्याकडेही दादा आहेत, पण आम्ही महिलांच्या लफड्यात पडत नाही. आम्ही पुरुषांशी समोरासमोर लढतो,’ अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
‘राम बोलो भाई राम…’; गुलाबराव पाटलांचे वादग्रस्त विधान
फलटण पालिका निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित सभेत गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत भाजपवर प्रहार केला. ते म्हणाले, कुठल्या मुलीने किंवा सुनेने आत्महत्या केली आणि त्यात माझे नाव आले, असे कधीच घडले नाही. फलटणमध्ये प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना यावे लागले, ही किती वाईट वेळ आहे. मुख्यमंत्र्यांना नाईलाजाने येथे यावे लागले. सभेच्या शेवटी त्यांनी, आम्ही खांदेकरी आहोत… राम बोलो भाई राम, बजा दिया काम, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा –मुंबईचा महापौर आमचाच! महायुतीचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांचा सस्पेन्स कायम
पालकमंत्री शंभूराज देसाईंचा ‘सळो की पळो’चा इशारा
दरम्यान, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही भाजपला थेट इशारा दिला. फलटणमधील राजकीय संघर्षावर भाष्य करताना ते म्हणाले, कुणी अंगावर आले तर पाठ दाखवून पळणे ही शिवसेनेची पद्धत नाही. कुणी ‘आरे’ केले तर ‘कारे’ करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. रामराजे तुम्ही फक्त हाक द्या, संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिक फलटणमध्ये उतरवू. शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागला, तर याद राखा. आम्ही दहा पावले पुढे जाऊन चढाऊ हल्ला करू.
मैत्रीपूर्ण लढत की उघड संघर्ष?
गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप उमेदवारांसाठी सभा झाली होती, ज्यात त्यांनी मित्रपक्षांवर टीका करणे टाळले होते. मात्र, सायंकाळी झालेल्या शिंदे गटाच्या सभेने चित्रात पूर्ण बदल केला. या सभेला रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


