NCP SP Municipal Corporation List: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आपले रणनीतीचे पत्ते उघडले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज २७ महानगरपालिकांसाठी निवडणूक प्रभारींची घोषणा केली. यात खासदार, आमदार आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवून पवारांच्या पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी कंबर कसली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्याची जबाबदारी सुप्रिया सुळेंकडे, तर मुंबईत रोहित पवारांचा ‘कसोटी’
या नियुक्त्यांमध्ये सर्वात लक्षवेधी जबाबदारी युवा नेते आमदार रोहित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यांना देशाची आर्थिक राजधानी मुंबईचे निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे. तर पुण्याची जबाबदारी पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे असेल. पिंपरी-चिंचवडमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि रोहित पवार अशी जोडगोळी निवडणुकीची धुरा सांभाळेल.
दिग्गजांकडे बालेकिल्ल्यांचे रक्षण
- ठाणे पट्टा: आक्रमक नेते जीतेद्र आव्हाड यांच्याकडे ठाणे, उल्हासनगर आणि मीरा-भाईंदर अशा तीन शहरांची जबाबदारी असेल. स्वतः प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे नवी मुंबई आणि पनवेलची कमान सांभाळतील.
- पश्चिम महाराष्ट्र: सांगलीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोल्हापूरसाठी हर्षवर्धन पाटील आणि सोलापूरसाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
- विदर्भ आणि मराठवाडा: नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख तर छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार बजरंग सोनवणे ताकद लावणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या सर्व खासदारांना आता स्थानिक पातळीवर सक्रिय केले आहे. नीलेश लंके, धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग सोनवणे आणि डॉ. अमोल कोल्हे यांसारख्या नेत्यांना प्रभारी बनवून पक्षाने महाविकास आघाडीत (MVA) जास्तीत जास्त जागांवर दावा ठोकण्याचे संकेत दिले आहेत.


