Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि बहुप्रतीक्षित घडामोडीवर अखेर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी वैयक्तिक मतभेद बाजूला सारून ‘शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ यांच्या युतीची अधिकृत घोषणा केली. वरळी येथील ‘ब्लू सी’ हॉटेलमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी आम्ही राज्याच्या हितासाठी एकत्र आलो आहोत, असा ठाम संदेश दिला.
शिवतीर्थावर संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र
युतीच्या घोषणेपूर्वी एक भावनिक दृश्य पाहायला मिळाले. राज आणि उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब दादरच्या शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या उपस्थितीने ‘एकवटलेल्या ठाकरे कुटुंबाची’ ताकद अधोरेखित झाली.
राज ठाकरेंचा रोखठोक पवित्रा
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, या विचारातूनच आमच्या एकत्र येण्याची सुरुवात झाली. सध्या राजकारणात ‘पार्टी फोडणाऱ्या आणि उमेदवार पळवणाऱ्या’ टोळ्या सक्रिय आहेत, त्यामुळे आम्ही जागावाटपाचा आकडा आताच जाहीर करणार नाही. राज यांनी पुढे ठणकावून सांगितले की, ‘मुंबईचा आगामी महापौर हा मराठीच असेल आणि तो आमच्या युतीचाच असेल. ज्यांना मुंबई आणि महाराष्ट्रावर प्रेम आहे, त्यांनी या युतीला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
‘आता चुकाल तर संपाल’ – उद्धव ठाकरे
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपवर कडक शब्दांत टीका केली. भाजपला मुंबईचे लचके तोडायचे आहेत. आता आम्ही आपसात भांडत राहिलो, तर तो हुतात्म्यांचा अपमान ठरेल. आम्ही केवळ एकत्र आलो नाही, तर आता कायम एकत्र राहण्यासाठी आलो आहोत, असे ते म्हणाले. विधानसभेतील ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला सावध केले की, आता चुकाल तर कायमचे संपाल, त्यामुळे मराठीचा वसा सोडू नका.


