PMC Election 2026 : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय आघाड्यांचे चित्र स्पष्ट होईल असे वाटत होते, मात्र प्रत्यक्षात सर्वच गणिते विस्कळीत झाली आहेत. पुण्यात आता दोन प्रमुख आघाड्यांमध्ये थेट लढत होण्याऐवजी, बहुतांश जागांवर ‘फ्रेंडली फाईट’ किंवा बहुरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. युती आणि आघाडी केवळ कागदावरच राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, तरीही ‘एबी’ फॉर्मचा सस्पेन्स!
अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा झाली होती. आमदार रोहित पवार यांनीही पुण्यात दोन्ही पक्ष मिळून भाजपला रोखणार असल्याचे सांगितले. मात्र, जागावाटपाचा आकडा अद्याप गुलदस्त्यातच आहे.शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी वारंवार विचारूनही जागांचा आकडा स्पष्ट न झाल्याने नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, ७० हून अधिक प्रभागांत शरद पवार गटाने उमेदवारांना ‘एबी’ फॉर्म वाटले आहेत. जागांचे वाटप न झाल्यामुळे अनेक प्रभागांत दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत.
हेही वाचा – Pune MHADA Lottery : पुणे म्हाडा लॉटरीची प्रतीक्षा संपणार! 4186 घरांचा ‘लकी ड्रॉ’ लवकरच निघणार
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू केले आहे. शिवसेनेने भाजपकडे २५ जागांची मागणी केली होती, मात्र भाजपने केवळ १५ जागा देऊ केल्याने शिंदे गटात धुसफूस आहे. मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे म्हणत सावध पवित्रा घेतला असला, तरी स्थानिक पातळीवर मात्र युती तुटल्यात जमा असल्याचे चित्र आहे.
पुण्यात आता कोणाकोणात लढत
दरम्यान, २०१७ मध्ये एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपला यंदा सर्वच आघाड्यांवर लढावे लागणार आहे. पुण्यात आता खालील गट स्वतंत्रपणे किंवा अर्धवट आघाडीत भिडणार आहेत:
१. भाजप (एकला चलो रे भूमिकेत)
२. शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
३. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
४. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
५. महाविकास आघाडी (काँग्रेस + ठाकरे गट + वंचित + मनसे)


