Riteish Deshmukh slams Ravindra Chavan : लातूरमधून दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या वादग्रस्त वक्तव्यावर विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी संयमित पण तितक्याच ठाम शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
रितेश देशमुख यांनी मंगळवारी सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं, “दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र.” त्यांच्या या प्रतिक्रियेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण लातूरमध्ये आले होते. यावेळी एका सभेत बोलताना त्यांनी, “लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील,” असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे लातूरसह राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या वक्तव्यावर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संताप व्यक्त करत म्हटलं की, “स्व. विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसू शकणारा अजून जन्मालाच आलेला नाही. विलासराव देशमुख यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी दिलं आहे. भाजप नेत्यांना लातूरकरांच्या भावनांचा अंदाज नाही.”
रितेश देशमुख यांच्या प्रतिक्रियेमुळे हा मुद्दा अधिकच चिघळला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तापण्याची चिन्हं आहेत.


