Virendra Tandel: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजलेला असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. संतोष धुरी यांच्या राजीनाम्याचा धक्का ताजा असतानाच, माहीममधील मनसेचे वजनदार नेते आणि माजी नगरसेवक विरेंद्र तांडेल यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी थेट राज ठाकरे यांना भावनिक पण परखड पत्र लिहून आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे.
तांडेल यांनी पत्रात काय म्हटले?
विरेंद्र तांडेल यांनी आपल्या राजीनामा पत्रात पक्षाच्या स्थानिक कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, माहीम विभागातील संघटनात्मक कामात मला ज्या प्रकारची वागणूक दिली जात आहे, ती अत्यंत वेदनादायी आणि अपमानास्पद आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये एकजूट आणि आपुलकी राहिलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. राज साहेब कार्यकर्त्यांना मान देतात, पण दुर्दैवाने ती विचारधारा स्थानिक व्यवस्थापनात (Local Management) दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – Maharashtra Politics : महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? अजित पवारांच्या सूचक वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ
राज ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात खिंडार
माहीम हा मनसेचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो. याच भागातून मनसेचे एकमेव आमदार निवडून आले होते. अशा महत्त्वाच्या विभागात तांडेल यांच्यासारख्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्याने पक्ष सोडल्यामुळे मनसेच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रभाग क्रमांक १९० मध्ये तांडेल यांचा मोठा जनसंपर्क असून, त्यांच्या राजीनाम्याचा फटका आगामी निवडणुकीत मनसेला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षातील गळती मनसेसाठी चिंतेची बाब
महानगरपालिका निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना एकापाठोपाठ एक माजी नगरसेवक पक्ष सोडून जात असल्याने मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त करूनही स्थानिक नेत्यांच्या ‘कुरघोडी’मुळे तांडेल यांनी घेतलेला हा निर्णय मनसेसाठी मोठा आत्मचिंतनाचा विषय ठरत आहे.


