Pimpri Chinchwad Election 2026: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने रहाटणी भागात मोठी कारवाई केली आहे. मतदारांना वाटप करण्यासाठी आणलेल्या तब्बल १९ वॉशिंग मशीन एका ट्रकमधून जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रार दाखल
निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाला १२ जानेवारीच्या रात्री साडेदहाच्या सुमारास रहाटणीतील गणराज कॉलनी येथे संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. पथक प्रमुख राहुल निकम यांनी तातडीने धाड टाकली असता, MH 14 KA 6330 क्रमांकाच्या गाडीमध्ये या मशीन आढळून आल्या. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
निवडणुकीत ‘भन्नाट’ ऑफर्सची चर्चा
पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील श्रीमंत उमेदवारांनी यंदा विजयासाठी तिजोरीचे दरवाजे खुले केल्याचे दिसत आहे. वॉशिंग मशीनसोबतच इतरही अनेक धक्कादायक ऑफर्सची चर्चा सध्या रंगली आहे.
- थायलंड टूर आणि जमीन: काही प्रभागांमध्ये मतदारांना चक्क ५ दिवसांची थायलंड सहल आणि एक गुंठा जमिनीचे आमिष दाखवले जात आहे.
- हेलिकॉप्टर राईड: कसब्यात महिलांसाठी आयोजित पैठणीच्या खेळात चक्क हेलिकॉप्टर प्रवासाचे बक्षीस देण्यात आले.
- लकी ड्रॉमध्ये प्लॉट: लोहगाव-धानोरी भागात ११ गुंठ्यांचे प्लॉट लकी ड्रॉद्वारे देण्याचे अजब आश्वासन एका उमेदवाराने दिले आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडच्या १२८ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडणार आहे. निवडणूक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी ‘एसएसटी’ आणि ‘व्हीएसटी’ पथकांना हाय अलर्टवर ठेवले आहे.


